पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी नुकतीच पार पडली. या तपासणीत निदर्शनास आलेल्या त्रुटीनुसार ९ उमेदवारांना नोटीस निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. निवडणूक खर्च निरीक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत निवडणूक खर्च तपासणी अधिकाऱ्यांकडून ही तपासणी पार पडली. भोसरी विधानसभेत एकूण ११ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यांचे दररोजच्या खर्चाचे लेखे व खर्चाच्या पावत्या या लेखांकन पथकाकडे जमा केल्या जातात. त्याचवेळी शॅडो रजिस्टरमध्ये उमेदवारांचा रोजचा प्रचार खर्च नोंदवला जातो. त्रुटीनुसार काही खर्च बँक खात्यातून न केल्याचे तपासणीमध्ये निदर्शनास आल्यामुळे ९ उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली.
यामध्ये बलराज कटके, अमजद खान, जावेद शहा, अरुण पवार, खुदबुद्दीन होबळे, गोविंद चुनचुने, हरिश डोळस, रफीक कुरेशी, शलाका कोंढावार या उमेदवारांना नोटीस देत ४८ तासात खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. तर, अजित गव्हाणे यांना त्यांच्या स्वतःच्या वाहनावरील इंधनाच्या खर्चाची दैनंदिन नोंद दर्शविण्यास बजावण्यात आले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवनाथ लबडे यांनी दिली.