राजेंद्रकुमार शेळके
पुणे : आजकालची तरुण पिढी बिघडत चालली आहे. नात्यांची जाण नाही, वयोवृद्धांबद्दल आदर, आत्मीयता नाही… असे संवाद अनेकदा कानी पडतात. मात्र, ही दूषणे फोल असल्याचे याच तरुण पिढीने दाखवून दिले असून, आदर्शवत कामगिरी केली आहे. रस्त्याच्या कडेला रडवेल्या अवस्थेत बसलेल्या निराधार आजीला खराडी (पुणे) येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हक्काचा निवारा मिळवून दिला आहे.
खराडी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सोशल फार्मसी’ या विषयांतर्गत घेण्यात आलेल्या फील्ड व्हीजट दरम्यान एका वृद्धाश्रमाला भेट दिली. त्यानंतर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उरसळ कॉलेज ऑफ फार्मसी डिप्लोमा महाविद्यालयाचे विद्यार्थी मंदार पठारे, यश पठारे, सुकृत निकम, हंसिका राठोड हे महाविद्यालयात येत असताना त्यांना एक आजी रस्त्याच्या कडेला रडवेल्या असस्थेत दिसल्या. नुकतीच मुलांनी वृद्धाश्रमाला भेट दिली होती. त्यामुळे त्यांनी आजीचे दुःख अचूक जाणले.
मुलांनी आपुलकीने आजीबाईंची चौकशी केली. त्यावेळी मुलांना त्यांनी हक्काने कुठेतरी राहण्याची सोय करण्याची विनंती केली. आजीची अवस्था पाहून मुलेही रडवेली झाली. या परिस्थितीत मुलांना नुकत्याच भेट देऊन आलेल्या वृद्धाश्रमाची आठवण झाली. त्यांनी लगेच दूरध्वनी करून एन.एस.एस. अधिकारी प्रा. प्रियंका बोरुडे यांना याबाबत कल्पना दिली. प्रा. बोरुडे यांनी तत्काळ कॅब बुक करून या आजींना ‘माहेर’ वृद्धाश्रमात दाखल केले आणि आजींना एक हक्काचा निवारा मिळवून दिला.
शैक्षणिक जीवन जगत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेऊन विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सचिन कोतवाल यांनी सर्व विद्यार्थ्यांचे आणि प्रा. प्रियंका बोरुडे यांचे कौतुक केले. तसेच त्यांनी केलेल्या या विधायक कामासाठी शुभेच्छा दिल्या.