थेऊर, (पुणे) : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री चिंतामणी मंदिरात सोमवारी (ता. 18) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
चंदनाचा लेप लावलेल्या स्वयंभू मुर्तीला हारतुऱ्यांची सजावट, धुप अत्तराचा दरवळत असलेला सुंगध यातून ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते. कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने पहाटेपासूनच भाविकांनी चिंतामणीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
पहाटे आगलावे बंधु यांच्या हस्ते श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली. देवस्थान तर्फे मंदिर प्रांगणात पत्रा शेड व मांडव घालण्यात आले होते. संकष्टीनिमित्त मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल्स ग्राहकांनी गजबजले होते. दर्शन रांगामुळे मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडीचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने ह.भ.प.विश्वंभर महाराज कोल्हे, परभणी, यांचे सुभाष्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना झाल्यानंतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात येणार आहे. देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस परिसरात लक्ष ठेवून होते.