उरुळी कांचन (पुणे): राज्यासह जिल्ह्यात शाळेत आजपासून प्रवेशप्रक्रिया जोरात सुरु असताना कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बोधे-काकडे वस्ती येथील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता नसल्याने दत्त मंदिरात शाळा भरवण्यात आल्याचा नामुष्कीजनक प्रकार सोमवारी (ता. 16) उघडकीस आला आहे.

सोमवारपासून शाळा सुरु झाल्या आहेत. बोधे-काकडे वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेला जायला रस्ता नसल्याने विद्यार्थी शाळेत जाणार का व रस्ता सुरु होणार का याकडे परिसरातील नागरिकांचे व पालकांचे लक्ष लागले होते. त्यानुसार शाळेतील शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सदरची शाळा ही ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदिरात भरवली.

कोरेगाव मूळ हद्दीतील बोधे- काकडे वस्ती परिसरातील जिल्हा पारिषद प्राथमिक शाळेत व अंगणवाडीत एकूण 60 ते 65 मुले शिकत आहेत. या शाळेसाठी खासगी जागेतून रस्ता होता. तो जागामालकांनी पत्रे लावून बंद केला आहे. शिक्षणाची आवड असल्याने सर्व मुले या भिंतीवरून त्या भिंतीवर उड्या मारून दररोज शाळेत न चुकता येतात. या विद्यार्थ्यांची नेहमीची ही कसरत बघून प्रशासन काही उपाययोजना करेल का आणि रस्ता उपलब्ध करून मिळेल का, असा प्रश्न विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
याबाबत बोलताना कोरेगाव मूळच्या ग्रामविकास अधिकारी स्वाती राजगुरू म्हणाल्या, “शाळा सुरु करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात रस्ता करून घ्या अशा सूचना गटविकास अधिकारी शिवाजी नागवे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शेजारील शेती मालकाशी चर्चा करून एक महिन्याच्या मुदतीवर रस्ता करून शाळा सुरु केली आहे.”
हवेलीचे शिक्षणाधिकारी ज्ञानदेव खोसे म्हणाले, ” मी स्वतः आज त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून आलो आहे. हवेलीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव करून त्याची तक्रार देणार आहोत. तसेच शाळेला रस्ता लवकर मिळावा यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार केला आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सरपंच, सदस्य, पालक उपस्थित होते.
याबाबत हवेलीचे गटविकास अधिकारी (बी.डी.ओ) शिवाजी नागवे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.







