पुणे पोलिसांनी शहरात कारवाई करत 1 लाख रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. सध्या पुण्यात ड्रग्ज तस्करीमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, मार्केट यार्ड पोलिसांनी ड्रग्ज तस्करीतील एका कुख्यात गुन्हेगाराला केलेल्या कारवाई अंतर्गत अटक केली आहे.आरोपी बेकायदेशीर ड्रग्ज विकण्याचा कट रचत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अतिक करीम बागवान (27) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.आरोपी अतिक हा मार्केट यार्ड येथील आंबेडकर नगर येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथक तपासासाठी निघाले तेव्हा त्यांना आंबेडकर नगर परिसरात बागवान अंधारात उभा असल्याचे दिसून आले. आंबेडकर नगर परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीमागे लपलेला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपी निसटला, पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करून अखेर त्याला जेरबंद केले आहे.
अतिक करीम बागवानमुळे अनेक तरुण लोक आता ड्रग्ज तस्करीकडे वळत होते. त्यामुळे कुख्यात गुन्हेगार हाती लागल्याने पुढील कारवाई करण्यास आणखी सोपी जाणार आहे. चौकशी केली असता, बागवानने सुरुवातीला पोलिसांना टाळण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिक चौकशी केल्यानंतर त्याने ड्रग्जच्या व्यापारात सहभागी असल्याचे कबूल केले. चौकशी दरम्यान आरोपीकडे 6.3 ग्रॅम मेथाडोन आढळले, ज्याची किंमत तब्बल 1,09,000 रुपये इतकी आहे. पोलिसांनी ड्रग्ज विक्रेत्यांवर देखरेख असूनही, शहरात बेकायदेशीर पदार्थांची विक्री सुरूच आहे. अलिकडेच, ड्रग्ज विरोधी पथकाने मेथाडोन तस्करीत सहभागी असलेल्या नाना पेठेतील दोन आरोपींना अटक केली होती. परंतु ड्रग्ज तस्करीची साखळी किती दूरवर पसरली आहे याचा तपास पोलिस करत आहेत.