पुणे : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरुडे, वाफगाव तसेच शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरातील गावे अवर्षणग्रस्त असून कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित आहेत. शासनाच्या माध्यमातून पाणीप्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही राज्यमंत्री मेघनी साकोरे-बोर्डीकर यांनी दिली. अनेक वर्षे पाणीप्रश्नी संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, उद्योजक रमेश दौंडकर यांनी नागपूर येथे त्यांची भेट घेऊन पाणीप्रश्नी पुढाकार घेण्याची मागणी केली.
मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे गाव केंदूर असून माहेर जिंतूर आहे. मार्च २०२२ मधील अर्थसंकल्पीय अधिवशनातही कळमोडी योजनेबाबत त्यांनी टाव्हरे यांच्या पाठपुराव्यानुसार तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. साकोरे-बोर्डीकर यांना मिळालेल्या मंत्रिपदाच्या माध्यमातून निश्चितच पाणीप्रश्न मार्गी लागेल, असे अशोकराव टाव्हरे यांनी सांगितले.
डिंभे, चासकमान, कळमोडी धरणसाठ्यांच्या फेरसर्वेक्षणाबाबत डिसेंबर २०२३ मधील नागपूर येथील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्या होत्या. सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे, उद्योजक रमेश दौंडकर यांच्याशी पाणीप्रश्नी चर्चा करताना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकार्यातून निश्चितच शिरूर व खेड तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिली.
डिंभे, चासकमान व कळमोडी या धरणांचे पाणीवाटप, नागरीकरणामुळे कमी झालेले सिंचन क्षेत्र याचे फेरसर्वेक्षण करून त्याआधारे शिल्लक राहू शकणारे पाणी शिरूर तालुक्यातील केंदूर, पाबळ परिसरातील गावांना उपलब्ध करण्यासंदर्भात शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करू. तसेच खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावे कळमोडी योजनेच्या अतिरिक्त सिंचन क्षेत्रात जलसंपदा विभागाने समाविष्ट केल्याची माहिती टाव्हरे यांनी दिल्यानंतर त्यासाठीही सहकार्य करण्याची हमी मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली.