लोणी काळभोर, (पुणे) : घर का भेदी लंका धाए! पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील प्रसिद्ध असलेली तुकाई एक्सोटिक्स या नर्सरीमध्ये काम करणाऱ्या एका चालकाने 100 लिटर डिझेल चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे.
दादाराव वानखेडे (वय-34 सध्या रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संग्राम जगताप यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता.२२) फिर्याद दिली होती .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संग्राम जगताप यांचे कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत तुकाई एक्सोटिक्स नावाने एक नर्सरी आहे. या नर्सरीत आरोपी दादाराव वानखेडे हा गेल्या पाच ते सहा वर्षापासून चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान, आरोपीने नर्सरीमध्ये लागणारे 100 लिटर डिझेल चोरी केले होते.
याप्रकरणी संग्राम जगताप यांनी दादाराव वानखेडे यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला सापळा रुचून कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतून मोठ्या शिताफीने अटक केली.
ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, पोलीस हवालदार सतीश सायकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.