व्यसनमुक्ती विषयावर अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या डॉ. सोमनाथ गिते यांच्या कार्याची दखल ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली आहे. व्यसनमुक्तीवर प्रचार, प्रसार, प्रबोधनाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गिते यांच्या नावावर विक्रम नोंदवण्यात आला आहे. या संस्थेकडून त्यांना सन्मानचिन्ह, ट्रॉफी, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.
सध्याची तरुणाई ही विचारांनी समृद्ध आहे. तरुण पिढी उज्वल भविष्याचा आधार मानली जाते. परंतु हीच तरुणाई काही प्रमाणात व्यसनाच्या अधीन झाली आहे. त्यामुळे देशाचे भविष्य कुठेतरी अंधारात जाताना दिसत आहे. भारत हा सर्वात जास्त तरुण पिढी असलेला देश आहे. देशातील तरुण पिढीकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. या तरुण पिढीला योग्य मार्ग दाखवण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे डॉ. सोमनाथ गिते. गिते यांनी व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली आहे. डॉ सोमनाथ गितेंच्या कामामुळे आज कित्येक तरुण व्यसनापासून लांब गेले आहेत.
यापूर्वी त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाची आणि या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अभ्यासाची दखल घेत विश्वकर्मा युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंटकडून डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 (IBR), लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड (UWR), इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड्स या संस्थांनी कार्याची दखल घेऊन विक्रमाची नोंद केलेली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासन आणि अन्य संस्थांचे व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार, राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवादूत, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डॉ. मुक्ता पुणतांबेकर, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, स्व. मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, वर्षा विद्या विलास यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.