यवत : गेल्या १० दिवसांपासून घराघरात विराजमान झालेल्या गणरायाला निरोप देण्यासाठी अनंत चतुर्दशीला सर्वजण एकत्र आले. त्यात दौंड येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. यादरम्यान, ५ टन निर्माल्य संकलन करण्यात आले.
दौंड शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. दौंड शहरातील अनेक घरगुती व मोठ्या मानांच्या गणपतीची विसर्जन हे अनंत चतुर्दशीला केले जाते. त्यामुळे भीमा नदी पात्रालगत गणपती विसर्जन दरम्यान मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हे सर्व लक्षात घेता डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हार, फुले, दुर्वा, खराब झालेली फळे इ. निर्माल्यचा वापर व्हावा व नदी प्रदूषित होऊ नये यासाठी एकत्रितपणे एका शेतामध्ये मोठा खड्डा खोदण्यात आला होता. यामध्ये जवळपास ५ टन निर्माल्य तीन ट्रॅक्टर व एका घंटा गाडीच्या माध्यमातून संकलित करण्यात आले.
या गोळा केलेल्या निर्माल्यातून कंपोस्ट खत तयार करुन झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्या वेगवेगळ्या करून त्याची दौंड नगरपरिषदेच्या वतीने योग्य ती विल्हेवाट लावण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या दौंड, गार, केडगाव, श्रीगोंदा, कुरकुंभ येथील जवळपास ७० ते ८० सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता.