सासवड : पुरंदर – हवेलीतील कार्यकर्त्यांचा आज झालेला मेळावा हा ऐतिहासिक क्षण आहे. तालुक्यातील गोरगरीब जनता, सर्वसामान्य नागरिकांचे रखडलेली कामे ही फक्त भाजपच्या हातूनच होणार आहे, असे मत जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी व्यक्त केले. महायुतीतील प्रत्येक पक्षाची ताकत, स्थिती, बाजू बघूनच विधानसभेसाठी जागा सुटणार आहे. तर हा आजच्या मेळाव्यातील महिलांची 70 टक्के उपस्थिती ही लाडक्या बहिणीचे चांगले प्रतीक असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपलाच पुरंदर-हवेलीची जागा मिळावी, अशी वरिष्ठाकडे मागणी आजच पूर्णत्वास नेणार असल्याचे देखील काळे यांनी यावेळी सांगितले.
सासवड (ता. पुरंदर) येथील आचार्य अत्रे सभागृह या ठिकाणी निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी पंडित मोडक, अशोक टेकवडे, गंगाराम जगदाळे, बाबाराजे जाधवराव, राहुल शेवाळे, जालिंदर कामठे, गिरीश जगताप, स्नेहल दगडे, दिलीप कटके, सुरेंद्र जेधे, नितीन काळे, मंगल पवार, सचिन पेशवे, सचिन लंबाते, महेश राऊत, द्वारका शिंदे, रवी खोमणे, संदीप हरपळे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना काळे म्हणाले की, गुंजवणीचे पाणी, विमानतळ, आंतरराष्ट्रीय बाजार, पुरंदर उपसा सिंचन योजना, जाणाई शिरसाई योजना या प्रकल्पांना भाजपचा आमदार झाला की सहा ते आठ महिन्यात गती मिळणार आहे. निवडणुका आल्या की फक्त नारळ फुटतात, परंतु प्रत्यक्षात परत त्याकडे बघितले जात नाही. तसे भाजपकडून होणार नाही. विमानतळाचा तेथील शेतकऱ्याला विचारल्याशिवाय व होकार मिळत नाही तोपर्यंत तो प्रकल्प होऊ देणार नाही, असे काळे यांनी यावेळी सांगितले.
आरक्षणाचा मुद्दा भिजत पडला असून तो प्रश्न प्रलंबित आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला, ऊसाला बाजार भाव नाही. शेतकऱ्यांची स्थिती बिकट आहे. त्यांना फक्त भाजपच न्याय देईल, असेही विचार काळे यांनी व्यक्त केले. या मेळाव्याचे आयोजन संतोष जगताप, साकेत जगताप, गणेश भोसले, राहुल हरपळे, अजिंक्य टेकवडे, श्रीकांत तामहाणे, पुरंदर -हवेलीच्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले. प्रास्ताविक निलेश जगताप यांनी केले. सूत्रसंचालन गणेश मेमाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन संदीप कटके यांनी मानले.