लोणी काळभोर : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया पार पडली असून, आता मंगळवारी (दि.4) याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ते आजपर्यंत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली आदर्श आचारसंहिता अद्याप शिथिल करण्यात आली नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा आक्षेपार्ह पोस्ट टाकू नका, असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांनी केलं आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 16 एप्रिलपासून ते 6 जूनपर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात आहे. पुणे जिल्ह्यासह संपूर्ण देशभरात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने, कोणताही नागरिक सदर निवडणूक निकालादरम्यान व निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप ग्रुप व इतर तत्सम ऍप्लिकेशनच्या किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील, अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेट्स, रिल्स, डिजिटल बॅनर असे प्रकार माध्यमांद्वारे करू नयेत.
तसेच कोणाच्याही विरोधात घोषणाबाजी करू नये. डीजे वाजवू नये, फटाके फोडू नये. विनापरवाना विजयी मिरवणूक काढू नये. व्हॉट्सऍप ग्रुपच्या ॲडमिनने त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ‘ओन्ली ऍडमीन’ असा बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाहीत.
जर ऍडमिनने सेटिंगमध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी सांगितले.