पुणे : आजच्या घडीला देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातो. गेल्या दहा वर्षांपासून भाजपची केंद्रात सत्ता आहे. तर राज्यातही पक्ष सत्तेत असून, पाच वर्षे पुणे महापालिकेची सत्ताही भाजपच्याच ताब्यात होती. सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या भाजपवर सध्या पुण्यात कायमस्वरूपी हक्काचे कार्यालय मिळेल का? असे म्हणण्याची वेळ आली आहे. मालक मुदत वाढवित नसल्याने भाजपचे शहरातील मध्यवर्ती कार्यालय सध्या स्थलांतरीत करण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्ष सध्या मध्यवर्ती कार्यालयाची जागा स्थलांतरीत करत आहे. भाजपचे कार्यालय प्रथम जोगेश्वरी मंदिराजवळ होते. त्यानंतर जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सन्मान येथे कार्यालय थाटल्यानंतर महापालिका भवनासमोर मुक्काम हलविण्यात आला. मात्र, जागा मालक मुदत वाढवित नसल्याने शहर कार्यालय स्थलांतरीत करण्याची वेळ मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपवर आली आहे. पक्षाला कायमस्वरूपी कार्यालय मिळावे यासाठी डीपी रस्त्यावर नवे कार्यालय लवकरच सुरू होणार असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यालयातून भाजपचे कामकाज चालणार असल्याच्या वृत्ताला भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. यानिमित्ताने देशातील सर्वाधिक मोठा पक्ष असलेल्या भाजपला हक्काचे कार्यालय का मिळत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
याविषयी बोलताना धीरज घाटे म्हणाले की, महापालिका भवनाजवळील जागा अपुरी पडत होती. पक्षाचा वाढता विस्तार लक्षात घेता नवे प्रशस्त कार्यालय हवे होते. जागेच्या मर्यादेमुळे नवे कार्यालय घेण्यात आले आहे. येथे पार्किंगचीही सुविधा असून, मोठ्या स्वरूपातील कार्यक्रम घेण्यासाठीही सुविधा येथे आहेत. कायमस्वरूपी जागेसाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जागा नेमकी कोणत्या कारणासाठी सोडावी आणि शोधावी लागली याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कामकाज सध्या डेंगळे पूल परिसरातील नव्या कार्यालया तून चालत आहे. मनसेने लालबहादूर शास्त्री रस्त्यावर कार्यालय घेतले आहे. काँग्रेसचे कामकाज कित्येक वर्षांपासून काँग्रेस भवनातून चालत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यालय डेक्कन परिसरातील पुलाची वाडी येथे तर शिवसेनेचे कार्यालय सारसबाग परिसरात आहे.