शिक्रापूर, (पुणे) : शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील एका खासगी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टर दाम्पत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलवर हल्ला केला आहे. याबाबत ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभयकुमार बाजीराव पडवळ (वय-४२, रा. अमरदिप सोसायटी कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये ओंकार घोडके या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याला उपचारासाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. ३० जून रोजी उपचारादरम्यान ओंकारचा मृत्यू झाला.
दरम्यान, ७ जुलै रोजी संतप्त काही महिला व पुरुष नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आले, त्यांनी डॉक्टरांना दमदाटी करत तुम्ही चुकीचे उपचार केल्याने आमच्या मुलाचा मृत्यू झाला, असं म्हणत डॉ. अभयकुमार पडवळ व डॉ. सीमा पडवळ यांना जबर मारहाण केली. टेबलवरील वस्तू घेऊन डॉक्टर अभयकुमार यांच्या डोक्यात मारल्याने ते जखमी झाले.
तर सोबत आलेल्या इतर व्यक्तींनी रुग्णालयाच्या खिडकीच्या काचा फोडल्या. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे करत आहे.