पुणे: पुण्यातील ससून रुग्णालयाची (Sasoon Hospital) लिफ्ट ३ नोव्हेंबर रोजी बंद पडून लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची घटना ताजी असतानाच, आता लिफ्ट बिघडल्याने डॉक्टर अन् नर्स अडकल्याची घटना शनिवारी घडली. यामुळे ससूनच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. प्रशासनाच्या या कारभाराचा फटका रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला आहे.
ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील लिफ्ट पुन्हा शनिवारी बिघडली. त्यात डॉक्टर आणि नर्ससह तीन जण अडकले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर लिफ्ट पुन्हा सुरू झाली. परंतु, या अर्ध्या तासाच्या कालवधीत डॉक्टर आणि नर्स यांना लिफ्टमध्ये श्वास घेणेही अवघड झाले होते. लिफ्ट बंद पडल्यामुळे सर्वजण घाबरले होते. सर्वांचे सुदैव चांगले होते, त्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.
दरम्यान, पुण्यातील ससून रुग्णालयाची लिफ्ट ३ नोव्हेंबर रोजी बंद पडली होती. त्या दिवशी चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली होती. ही लिफ्ट सरळ कापून लोकांची सुटका करावी लागली. त्यात ५ पुरुष आणि १ महिला सुमारे तासभर अडकले होते. या लोकांना लिफ्टमधून बाहेर काढण्यासाठी पुणे मनपाच्या अग्निशमन दलाच्या टिमला रेस्क्यू ऑपरेशन करावे लागले. सहा जणांना बाहेर काढल्यानंतर त्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते. त्यामुळे सहा पैकी चार जणांना ऑक्सिजन लावण्यात आले होते. सहा जणांमध्ये चार जण रुग्णालयाचे कर्मचारी होते.
पुणे येथील ससून रुग्णालय (Sasoon Hospital) गेल्या दोन-तीन महिन्यात राज्यभर चांगलेच परिचित झाले आहे. ड्रग्स प्रकरणातील कैदी ललित पाटील तीन वर्ष कैदेच्या कालावधीत नऊ महिने ससूनमध्ये होता. तो रुग्णालयातून पळून गेल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनावर चौफेर टीका होऊ लागली. ते कमी की काय म्हणून आता रुग्णालयाच्या लिफ्टमुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा समोर आला आहे. याच महिन्यात ससून रुग्णालयाची लिफ्ट बंद पडली होती. त्यात सहा जण अडकले होते. आता दुसऱ्यांदा शनिवारी ही लिफ्ट बंद पडली आहे. त्यात डॉक्टर आणि नर्सही अडकले. महिन्याभरापूर्वीच्या अनुभवानंतरही ससून प्रशासनाने अजून काही धडा घेतला नाही, हे शनिवारी पुन्हा स्पष्ट झाले आहे. सतत लिफ्ट बंद होत असल्यामुळे रुग्ण आणि कर्मचाऱ्यांनीही धास्ती घेतली आहे.