संदिप टूले / केडगाव : गेली काही दिवस दौंड विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही पदाधिकारी दिसत नव्हते. पण अजित पवार, राहुल कुल आणि दौंडचे पदाधिकारी यांच्यात बैठक झाली आणि आज (दि. ११) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आली.
यामध्ये दौंड विधानसभेचे महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांना आम्ही आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. परंतु विरोधक चुकीच्या अफवा पसरवत आहेत. त्यामुळे अजित पवार यांच्या सूचनेप्रमाणे दौंडचे उमेदवार राहुल कुल यांना आमचा पाठिंबा असून यापुढे आम्ही महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचेचं काम करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या प्रवक्त्या वैशालीताई नागवडे यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद चे माजी सदस्य वीरधवल जगदाळे यांनी सांगितले की, यापूर्वी दौंड विधानसभेसाठी महायुतीमधून दोन उमेदवारी अर्ज भरले होते. परंतु वाटाघाटी मध्ये ही जागा भाजपाला गेली. त्यामुळे महायुतीमध्ये कुठेही बिघाडी होऊ नये, यासाठी अजित पवारांच्या सूचनेप्रमाणे मी स्वतः माघार घेतली. त्यामुळे आमचा पाठिंबा यापुढे राहुल कुल यांनाच राहील. तसेच आम्ही व आमचे कार्यकर्ते हे भाजपचेच काम करणार आहे. आम्हाला जो पक्षादेश आला आहे, त्याचे तंतोतंत पालन करणार आहोत. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
दौंडच्या विकासामध्ये विरोधकांचा काही संबंध नाही
दौंडच्या विकासामध्ये राहुल कुल यांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही तेवढाच सहभाग आहे. त्यामुळे जो निधी आला तो आमच्या मार्फत आला. विरोधकांचा यात काहीही हातभार नाही. त्यामुळे दौंडमध्ये विकास झाला, तो महायुती सरकारने केला आहे.
वैशाली नागवडे, प्रवक्त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट