विशाल कदम
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दिवसा व रात्रीच्या वेळी डीजे, लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे. असे असतानाही पुणे शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासकीय नियम पायदळी तुडवून डीजे, बँड कर्णकर्कश आवाज वाढवून वाजवले जातात. या ध्वनिप्रदूषणाचा ज्येष्ठ नागरिकांसह लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत आहे. मात्र, याकडे पोलीस प्रशासनाने ‘हाताची घडी तोंडावर बोट’ ठेवून बघ्याची भूमिका स्वीकारल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर पोलिसांच्या या भूमिकेमुळे डीजे, लाऊडस्पीकरवाल्यांचे चांगलेच फावले आहे.
दरम्यान, विवाहसोहळा, सण-उत्सव, जयंती व विविध कार्यक्रमानिमित्त डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करून मोठ्या प्रमाणात ध्वनि प्रदूषण होत आहे. डीजेच्या आवाजाची पातळी धडकी भरवणारी आहे. यामुळे नागरिकांनी 112 या दूरध्वनी क्रमांकावर थेट तक्रार करावी. असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच तुम्हाला याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही करता येते.
ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मिरवणुका व अन्य उत्सवात डीजे व डॉल्बी सिस्टीमसारख्या वाद्यांवर सरकारने बंदी घातली आहे. शाळा, रुग्णालये अशा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी डीजे, लाऊडस्पीकरवरून मोठ्या आवाजात गाणे लावणे, फटाके फोडणे आणि हॉर्न वाजवणे यावर बंदी घातली आहे. ध्वनिप्रदूषण कायदा नियम, 2000 नुसार, शांतता क्षेत्र (रुग्णालये, शाळा, धार्मिक स्थळ, न्यायालये), निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्र असे चार विभाग केले आहेत. या प्रत्येक विभागात दिवसा व रात्रीच्या वेळी आवाजाची मर्यादा निश्चित केली आहे.
ध्वनि प्रदूषणामुळे नागरिकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. ध्वनि प्रदूषणामुळे रक्तदाब वाढतो व हृदयरोगाला आमंत्रण मिळते. ध्वनि प्रदूषणामुळे मानसिक संतुलन बिघडते. हळूहळू बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनि प्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. डीजेसमोरच धांगडधिंगा नाच केला जातो. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दणदणाटाला चाप कधी बसणार?
डीजे, लाऊड स्पीकरवाले कर्णकर्कश आवाज वाढवून शासनाचे नियम पायदळी तुडवीत आहेत. ध्वनी प्रदूषणाबरोबर, रुग्ण, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन डीजे, लाऊडस्पीकरवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
डीजेच्या लेझर लाईटचा डोळ्यातील रेटीनावर परिणाम
अलीकडच्या काळात लेझर शो जरी बंद झाले असले तरी काही ठिकाणी लेझरद्वारे आकृती तयार केली जाते आणि या लेझर लाईटचे फ्रिक्वेन्सी असते आणि या फ्रिक्वेन्सीमुळे आपल्याला हे लाईट दिसत असतात. लेझर लाईट तयार झाल्यानंतर आपल्या डोळ्यातील रेटिनावर पडत असतात. हे लाईट रेटिनावर पडल्यामुळे अनेक रुग्णांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्याचे दिसून आले. ज्या काही रक्तवाहिन्या आहेत, त्या बंद पडून तिथला रक्तपुरवठा हा खंडित होतो.
ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम :
70 डेसिबल या मर्यादेपर्यंतचा आवाज आपले कान सहन करू शकतात. 100 डेसिबलच्या वरील मर्यादेचा आवाज सतत कानावर पडत राहिल्यास कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते. परिणामी, कानाचा पडदा फाटू शकतो. बहिरेपणा येऊ शकतो. या आवाजामुळे कानाची जी नस आपल्या हृदयाला जोडलेली असते ती स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हार्ट अटॅक येऊ शकतो.
तक्रार कुठं कराल?
डीजे, बँड वाजविण्याच्या संदर्भात न्यायालयाने आवाजाच्या संदर्भात काही डेसिबलच्या मर्यादा दिलेल्या आहेत. त्या नियमांचे पालन करूनच त्यांनी डीजे, बँड वाजवावे. मात्र, जर कोणी कर्णकर्कश आवाज वाढवून शासकीय नियमाचे उल्लंघन करत असतील तर नागरिकांनी त्वरित ११२ या दूरध्वनी क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. तुमच्या तक्रारीची ताबडतोब दाखल घेऊन कारवाई करण्यात येईल. तक्रार देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पुणे शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षेची तरतूद…
पर्यावरण मंत्रालयाने 16 ऑगस्ट 2000 च्या निर्णयानुसार ध्वनिवर्धक वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. ध्वनिक्षेपकासाठी मर्यादा ठरवली आहे. औद्योगिक क्षेत्र (दिवसा 75, रात्री 70 डेसिबल), वाणिज्य क्षेत्र (दिवसा 65, रात्री 55), निवासी क्षेत्र (दिवसा 55, रात्री 45), शांतता झोन (दिवसा 50, रात्री 40) अशी मर्यादा आहे. रात्री दहानंतर ध्वनिक्षेपक लावण्यास बंदी आहे. ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा एक लाख रुपये दंड किंवा या दोन्ही शिक्षा होऊ शकतात.