कोथरूड : कोथरूड येथील गांधी भवन शेजारी असलेल्या ‘दि पूना स्कूल ॲन्ड होम फॉर दि ब्लाईंड गर्ल्स्’या शाळेतील विशेष मुलींना अन्नदान, कला व नाटक सादरीकरण सहित्याचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सामजिक व बहुउद्देशीय संस्थे तर्फे बढेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे आयोजन मंगळवार (ता. १७) करण्यात आले होते.
शाळेतील मुलींना कला, नाटक सादर करण्यासाठी जिरेटोप, ढाल, तलवार, चिलखत, मावळा व पुणेरी पगडी असे साहित्या बढेकर यांच्या हस्ते प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा रांका यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. उपस्थित विशेष मुलींनी बढेकर यांना शुभेच्छा दिल्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका वर्षा रांका यांनी बढेकर यांना पुश्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.
यावेळी बढेकर म्हणाले, “विशेष मुलींना सांभाळने, त्यांचे शिक्षण पूर्ण करणे, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे सामाजिक दायित्व या शाळेत होते. समाजिक भान ठेवून संस्थेच्या वतीने होत असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. पुढील काळात शाळेला व शाळेत शिकत असलेल्या मुलींना आवश्यक ती मदत करणार,” असे अश्वासन बढेकर यांनी दिले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सामजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या सचिव योगिता काटे, शिक्षिका उज्वला सोनी, वैशाली वडवळकर, ह्रषिकेश ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते.