न्हावरे: शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांचा भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य सुभाष कांडगे यांनी जाहीर निषेध व्यक्त करून, शिरूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अयशस्वी झाले असल्याचा आरोप कांडगे यांनी केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे न्हावरे येथे सोमवारी (ता.18) मंडल स्तरीय अभियान शिबीर पार पडले.
यावेळी सर्व विभागाचे स्थानिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, पशुवैद्यकीय विभागाचे कोणीही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे आणि पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सुमारे दीड तासाने उशिराने कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित परिसरातील अनेक नागरिकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तसेच या कार्यक्रमाविषयी जनजागृती व प्रसिद्धी करण्यासही महसूल विभाग कमी पडल्यामुळे या अभियानाबाबत संबंधित महसूल विभागाचे अधिकारीच निरुत्साही असल्याचे चित्र होते.
त्यामुळे शिरूर तालुक्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अयशस्वी झाल्यामुळे या अभियानात सामान्य नागरिकांची कामे झाली नाहीत. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे, सुभाष कांडगे यांनी सांगितले आहे.
“शिरूर तालुक्यात अनेक महा-ई-सेवा आणि सीएससी केंद्रांवर विविध कामांसाठी गेलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर सर्रास आर्थिक लूट होत आहे. तसेच अनेक केंद्रांवर कामांचे दरपत्रकही लावलेले नाही. याबाबत प्रशासनाने कारवाई करावी.”
-राजेंद्र दत्तात्रय राजेनिंबाळकर (नागरिक,न्हावरे)






