Maval News पुणे, ता. २ : कामगार दिनाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. मावळ तालुक्यातील जाधववाडी धरण (नवलाख उंबरे) आणि साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. Maval News

जाधववाडी धरणात तिघांचा बळी
जाधववाडी धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांपैकी अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार हे पाण्यात उतरले. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाच जण बुडाले. स्थानिकांच्या मदतीने दोघांना वाचवण्यात यश आले, मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या तरुणांना बाहेर काढून सीपीआर देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बराच वेळ उलटल्याने त्यांना वाचवता आले नाही. Maval News
पवना नदीत आणखी एकाचा बळी
दुसरी घटना साळुंब्रे येथील जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी पोहण्यासाठी नदीत उतरला होता. पाण्याची खोली न समजल्याने तो बुडाला. मनोज हा स्थानिक पाइपलाइन कंपनीत काम करत होता.
रेस्क्यू पथकाची धडपड
घटनेनंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, तळेगाव दाभाडे अग्निशामक दल तसेच एनडीआरएफच्या पथकाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. जाधववाडी येथील तिघांना ‘विरा ॲम्बुलन्स’द्वारे जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले, तर साळुंब्रे येथील तरुणाला पुढील तपासणीसाठी पवना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. Maval News
सुट्ट्यांमध्ये बेपर्वाई ठरते जीवघेणी
या घटनांमुळे पर्यटनस्थळी सुरक्षिततेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धरण व नदी परिसरात फिरताना काळजी घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाण्याची खोली, प्रवाह आणि सुरक्षिततेची साधने यांची खात्री करूनच पाण्यात उतरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेने चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Maval News







