उरुळी कांचन, (पुणे) : खडकवासला पाटबंधारे विभागाच्या जुन्या बेबी कालव्यातून वाहणारे घाण पाणी जलपर्णीमुळे अडले आहे. हे पाणी पाझरून आजूबाजूच्या शेतात व परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात साचत असल्यामुळे कालवा परिसरातील शेती व नागरिक संकटात सापडले आहेत. मात्र, याकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केले आहे.
याबाबत कोरेगाव मूळ व परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सदरची बाब कोरेगाव मूळ चे सरपंच भानुदास जेधे यांना कळवली. जेधे यांनी तात्काळ पाटबंधारे विभागाकडे माहिती देऊन पाठपुरावा केला व तात्काळ जेसीबी व नागरिकांच्या मदतीने कालव्यात असलेली जलपर्णी काढून घेतली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुठा कालव्यातून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे आणि जलपर्णीच्या अडथळ्याने दिवसेंदिवस कालव्याच्या परिसरात पाणीगळती वाढत आहे. सातत्याने होणाऱ्या गळतीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. तर, कालव्याच्या परिसरातील घरांमध्ये पाणी पाझरत आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली असल्याने पाण्याचा दबाव वाढून कालवा फुटण्याची शक्यता आहे. मोठी दुर्घटना होण्याआधी या कालव्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी सरपंच भानुदास जेधे यांच्याकडे केली होती.
सरपंच भानुदास जेधे, माजी सरपंच मंगेश कानकाटे व परिसरातील नागरिकांनी जेसीबीच्या माध्यमातून विठ्ठल नगर ते चौधरी वस्ती जवळील मुठा कालव्यातील घनदाट पसरलेली जलपर्णी व प्लास्टिक कचरा जेसीबीच्या सहाय्याने बाजूला काढला. कालव्यातील साठलेल्या पाण्याला मार्ग मिळाल्याने कालव्याचा परिसर स्वच्छ झाला. कालव्यामुळे होणारे नुकसान सरपंच जेधे यांनी तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे टळल्याने शेतकरी, नर्सरी उद्योजक, व स्थानिक नागरिकांनी सरपंच भानुदास जेथे यांचे आभार मानले.
कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे गरजेचे..
हवेली व दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पुरेसे पाणी मिळावे, या हेतूने सुमारे चाळीस वर्षांपासून बंद असलेला बेबी कालवा मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आला आहे. कालवा सुरू करत असताना कालव्याची संपूर्ण दुरुस्ती करणे गरजेचे होते. यामध्ये कालव्याच्या आतील बाजूस वाढलेले गवत काढणे, कमी-अधिक उंची असलेल्या कालव्यांच्या भरावाची दुरुस्ती करणे व कालव्याच्या ठिकाणच्या सर्व पुलांची उंची वाढविणे अपेक्षित होते. मात्र, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत खडकवासला पाटबंधारे विभागाकडून कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जुना बेबी कालवा गेला आहे. या कालव्यात जलपर्णी व झाडी असल्याने कालवा फुटू शकतो. यामुळे सोरतापवाडी व कोरेगाव मूळ येथील नर्सरी व्यवसायिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे भविष्यातील मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खडकवासला पाटबंधारे विभागाने खबरदारी म्हणून त्वरित उपाययोजना कराव्यात
-भानुदास जेधे, सरपंच, कोरेगाव मूळ, (ता. हवेली)उरुळी कांचन पाटबंधारे विभागाकडून पूर्व हवेलीतील गावातून जाणाऱ्या कालव्याची उशिरापर्यत जलपर्णी काढण्याचे काम सुरु आहे. सध्या एकच मशीन असल्याने उशीर लागत आहे. वरिष्ठांकडे अधिक मशीनची मागणी केली आहे. तसेच पाण्याचा दाब कमी सोडण्यासाठी सांगितले आहे.
-अर्चना जगताप, शाखाधिकारी, पाटबंधारे विभाग, उरुळी कांचन, (ता. हवेली)