पोपट पाचंगे / कारेगाव : आमच्या हक्काचे डिंभे धरणाचे पाणी बोगदा पाडून अहिल्यानगर जिल्ह्यात नेण्यासाठी कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार व खासदार निलेश लंके यांनी जाहिर सभेत वक्तव्य केले. हा बोगदा झाल्यास आंबेगाव, जुन्नर व शिरुर तालुक्यावर पुन्हा कायमस्वरूपी दुष्काळाचे संकट निर्माण होईल, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बोगद्याच्या कामाला माझा विरोध आहे. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी या बोगद्याला पाठींबा आहे कि विरोध? याबाबतची भूमिका जनतेसमोर मांडावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
शिरूर तालुक्यातील जातेगांव येथे आयोजित पत्रकार परिषदेत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, सेवानिवृत्त सनदी अधिकारी कांतीलाल उमाप, प्रकाश पवार, रविंद्र करंजखेले आदि उपस्थित होते.
मंचर येथे झालेल्या जाहीर सभेत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५२ पैकी ४२ आमदारांना गद्दार म्हणून भावनिक म्हणायचा प्रयत्न झाला. मात्र, आम्ही पक्षाने भाजप व महायुती बरोबर सत्तेत सहभागी होण्याच्या घेतलेल्या निर्णयाशी सहमत आहे. डिंभा माणिकडोह बोगद्याला शेतकऱ्यासाठी विरोध आहे. त्यामुळेचे मला बदनाम केले जात आहे. मी तालुक्याचे पाणी कुठेही जावू जाणार नसून, पुढील पाच वर्षात शिरुर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात येणार आहे.
ही निवडणूक गद्दार – खुद्दार अशी नसून, आंबेगाव शिरुर मतदारसंघाला भकास करायच्या षडयंत्राला उध्वस्त करण्याची असल्याने आपण या आधीच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताने विजयी होणार आहे. निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने निवडून येण्यासाठी मला साथ द्यावी, असे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी केले.