उरुळी कांचन, (पुणे) :‘गाव करील ते राव काय करील,’ अशी म्हण आहे. याची प्रचिती हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील इनामदारवस्ती येथील जिल्हा परिषदेची शाळा पाहिली की येतो. कधीकाळी चांगला नावलौकिक मिळवलेली ही शाळा इमारतीअभावी बंद पडते की काय, अशी शंका ग्रामस्थांना होती. मात्र, शाळेसाठी पूर्ण गाव एकवटला. ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी ३३ लाख रुपये लोकवर्गणी व शासनाची २२.५० लाख रुपयांची मदत असे एकूण ५५ लाख रुपये खर्च करून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी सुसज्ज शाळा आज मोठ्या दिमाखात उभी आहे.
आर्थिक सुबत्ता असतानाही ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेची शाळा सोडून इतर शाळांचा विचार केला नाही. कोरोनाच्या काळात ग्रामस्थांनी शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार केला. यासाठी कोरेगाव मूळ, तसेच परिसरातील नागरिकांनी लोकवर्गणी गोळा केली. एक, दोन नव्हे तर जवळपास शेकडो नागरिकांनी साहित्यासह आर्थिक मदत उभी केली. प्रशस्त खोल्या, डिजिटल शाळा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या शाळेला ग्रामस्थांनीही भरभरून मदत दिली. यातूनच शाळेचा कायापालट झाला आहे.
या शाळेचे उद्घाटन सौ. द्वारकाबाई सोपान सहादू शितोळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. सर्व गोरगरिबांच्या मुलांसाठी आधार वाटणारी ही शाळा भविष्यात टिकावी यासाठी नर्सरी उद्योजक सोपान साधू शितोळे यांनी शिक्षक, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या भावना लक्षात घेऊन आपली स्वतःची तीन गुंठे जागा शाळेसाठी दान केली. ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी ३३ लाख रुपये लोकवर्गणी व शासनाचे २२.५० लाख रुपये असे एकूण मिळून ५५ लाख रुपये खर्च करून एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी सुसज्ज शाळा बांधलेली आहे.
गेली सहा वर्षे ही शाळा कधी झाडाखाली तर कधी पत्र्याच्या शेडमध्ये भरत होती. कधीकाळी चांगला नावलौकिक मिळवलेली शाळा इमारतीअभावी बंद पडते की काय, अशी शंका ग्रामस्थांना वाटत होती. शासनाने तीन वर्ग खोल्यांसाठी २२.५० लाख रुपये निधी ‘डीपीसी’मधून उपलब्ध करून दिला होता. मात्र, तो पुरेसा नव्हता. शाळेचा निधी तुटपुंजा असल्याने बांधकामासाठी १० लाख रुपये देण्याचे कबूल केले. त्यामुळे बांधण्यासाठीचे सर्व अडथळे दूर झाले व प्रत्यक्ष शाळा बांधकाम फेब्रुवारी २३ मध्ये सुरू झाले.
शासनाने तीन वर्ग खोल्यांसाठी २२.५० लाख रुपये निधी ‘डीपीसी’मधून उपलब्ध करून दिला. हा निधी पुरेसा नसल्याने इनामदार वस्ती येथील या शाळेचे माजी विद्यार्थी दिलीप शितोळे, पै. मनोज शिंदे, शेखर सावंत इनामदार, संतोष शितोळे, धनंजय शितोळे, धनंजय शिंदे, विशाल कानकाटे, योगेश चौधरी, अमोल संभाजी भोसले, महेंद्र शितोळे, डॉ अमोल जेधे, बापू थेऊरकर, राहुल जगताप, कोरेगावमूळ ग्रामपंचायतचे सरपंच मंगेश कानकाटे, युवा उद्योजक स्वप्निल सावंत इनामदार, उरुळी कांचन येथील पतसंस्थेचे संचालक अशोक सावंत इनामदार, निवृत्ती वायकर, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेथे, बापुसाहेब बोधे, वैशाली सावंत व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या इमारतीसाठी आपले बहुमोल असे योगदान दिले.
एखाद्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेलाही लाजवेल अशी देखणी जिल्हा परिषदेची शाळा असू शकते यावर विश्वासच बसणार नाही. अशी एक सुसज्ज इमारत ग्रामस्थांच्या योगदानामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिकण्यासाठी उपलब्ध झाली आहे. यामध्ये केंद्रप्रमुख राठोड सर, नजमा तांबोळी मॅडम, मोरे सर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गुंजाळ सर, यांचेही मोलाचे योगदान लाभले.
शाळेच्या उद्घाटनप्रसंगी इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे सुश्राव्य व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक वसंत ठोंबरे गुरुजी होते. याप्रसंगी गोरख कानकाटे, हवेली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शिवाजी नागवे, रामदास चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंभार मॅडम, साळुंखे सर यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने उद्योजक संतोष शितोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार निलेश बोरकर यांनी मांडले.
ही आहेत शाळेची वैशिष्ट्ये
– सर्व खोल्यांत ई-लर्निंग व्यवस्था
– वर्ग खोल्यात डिजिटल बोर्ड
– अंतर्बाह्य रंगरंगोटी
– वारली पेंटिंग
– बोलक्या भिंती
– सुसज्ज संगणक लॅब
– सुसज्ज स्वच्छतागृहे
– कबड्डी, खो-खोतसेच विविध खेळांसाठी मैदान
– सीसीटीव्ही कॅमेरे