पुणे : अंगारकी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नेश्वराचे मंगळवारी (दि.25) रोजी लाखो गणेशभक्तांनी दर्शन घेतले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात गणेश यागाचे आयोजन करण्यात आले होते. या यागामध्ये एकूण 75 यजमान जोडप्यांचा सहभाग होता. यावेळी गणेश यागामध्ये सहभागी झालेल्या 75 यजमान जोडप्यांचा जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, गौरी बेनके, देवस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, अशी माहिती श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे यांनी दिली.
अंगारकी चतुर्थीनिमित्त पहाटे पाच वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण कवडे, उपाध्यक्ष तुषार कवडे, सचिव सुनिल घेगडे, खजिनदार दत्तात्रय कवडे, विश्वस्त विक्रम कवडे, प्रकाश मांडे, सुर्यकांत रवळे, गोविंद कवडे, विलास कवडे, विनायक मांडे, संतोष कवडे, समीर मांडे, मंगेश पोखरकर, विनायक जाधव, शिल्पा जगदाळे व ग्रामस्थ यांनी श्री विघ्नेश्वरास अभिषेक करून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले.
अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री विघ्नेश्वराच्या मंदिरावर फुलांची आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सात वाजता महाआरती, दुपारी बारा वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी आठ वाजता नियमित पोथी वाचन, सकाळी साडेदहा वाजता ‘श्री’ स नैवद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. अंगारकी चतुर्थीनिमित्त देवस्थानचे विश्वस्त सुर्यकांत रवळे यांनी अन्नदान केले. देवस्थान ट्रस्टच्या महाप्रसादलयामध्ये हजारो भाविकांनी महाप्रसाद घेतला. सायंकाळी सात वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला व चंद्रोदयापर्यंत डुंबरवाडी येथील कीर्तनकार ह.भ.प चंद्रकांत महाराज डुंबरे यांचे हरिकीर्तन झाले. रात्री साडेदहा वाजता शेज आरती करून अकरा वाजता मंदिर बंद करण्यात आले.