लोणी काळभोर, (पुणे) : विविध रंगी फुलांनी सजलेले अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी प्रख्यात धार्मिक स्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथे संकष्टी चतुर्थीला श्री चिंतामणी मंदिरात सोमवारी (ता. २९) भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्याने सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी “गणपती बाप्पा मोरया, मंगल मुर्ती मोरया”च्या जयघोषात चिंतामणीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाले होते.
श्री महेश आगलावे यांच्या हस्ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ‘श्रीं’ ची पूजा झाली. देवस्थान ट्रस्टच्यावतीने महापूजा करून सकाळी सहा वाजल्यापासून मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. चिंचवड देवस्थान व आगलावे बंधू यांच्या वतीने मंदिराच्या प्रांगणात मंडप घालण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात अली होती. तसेच उपवासाच्या खिचडी व चिवड्याचे वाटप करण्यात आले. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट आणि अक्षय ब्लड सेंटर यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. पुणे शहर उपायुक्त रुख्मिणी गलांडे यांनी मंदिराला भेट दिली. सायकलने अष्टविनायक दर्शन करणार्या भाविकांनी रक्तदान शिबीरात सहभाग नोंदवला. रुख्मिणी गलांडे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली.
दरम्यान, थेऊर परिसरात लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामपंचायतीतर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळी यांची साथीने ह.भ.प. निर्मलनाथ महाराज (आळंदी देवाची) यांचे सुभाष्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. चिंतामणी प्रासादिक भजनी मंडळाची साथ लाभणार आहे. तसेच चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना काढण्यात येणार असून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्वांवर देवस्थानचे विश्वस्त केशव उमेश विद्वांस लक्ष ठेवून होते.