पुणे : देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री झाले की, राज्यातला क्राईम आणखी वाढतो. पुण्यात दिवसाढवळ्या खून होतात. दिवसाढवळ्या पुण्यात गाड्यांची तोडफोड होत आहे. हे गृहमंत्री आणि गृह खात्याचं सपशेल अपयश आहे. जेव्हा जेव्हा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असतात तेव्हा तेव्हा सगळ्यात जास्त क्राईम हा नागपुरात होतो, असा गंभीर आरोप बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी देखील पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाली. भरदिवसा गोळ्याझाडून हत्या केल्याने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. अशात या घटनेवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडवीस यांचावर हल्लाबोल केला आहे. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी पुण्यातल्या कोयता गँगचा देखील उल्लेख केला आहे. पुण्यात महिला मला भेटतात आणि म्हणतात आम्हाला कोयता गँगची फार भीती वाटते. आमचं सरकार असताना होती का कोयता गँग?, असा सवाल सुप्रिया सुळेंनी जनतेला विचारला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री पंचेचाळीस प्लस मध्ये व्यस्त आहेत. त्यांना अधिकार नक्की किती आहेत हे समजत नाही. देवेंद्र फडणवीस आता टिव्हीवर फार दिसत नाहीत. दादा दिसतात, मुख्यमंत्री तर रोजच दिसतात पण आधी सारखे देवेंद्र जी दिसत नाहीत. आमचं पटो न पटो आधी ५ वर्ष ते नेहमी मुख्यमंत्री म्हणून टिव्हीवर दिसत होते. आता दिसत नाहीत. कधीतरी नागपूर विमानतळावर दिसतात एक प्रश्न घेतात आणि नमस्कार करून निघून जातात, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांना कोपरखळ्या दिल्यात.
सुप्रिया सुळें पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस या सरकारमध्ये किती अक्टिव्ह आहेत माहीत नाही. मात्र त्यांच्यावर अन्याय झाला आहे. वर्गात सर्वात पाहिले आले आणि त्यांना मागे बसवलं. मुख्यमंत्र्यावरून त्यांना हाफ मुख्यमंत्री केलं, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.