पुणे: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरली असली, तरी याच योजनेवर आता सत्ताधारी गटातीलच आमदारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याच्या या योजनेसाठी अन्य विकासकामांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप अजित पवार गटातील मंत्र्यांकडून समोर आला आहे.

कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच इंदापूरमध्ये घरकुलाच्या धनादेश वितरण कार्यक्रमात सहभागी होताना या योजनेबाबत सूचक टिप्पणी केली. त्यांनी इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला आणि, “विकास निधी वेळेवर मिळत नाही, कारण तो निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातो,” असा थेट आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज थेट प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“नेमका कुठला निधी मिळाला नाही आणि कुठल्या अर्थानं ते बोलले, हे त्यांना विचारून सांगतो. तो माझा सहकारी आहे, मंत्रिमंडळात आहे, मी त्याला विचारणारच,” असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.
भरणे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. विरोधकांनी सरकारवर टीका करताना म्हटलं आहे की, “लोकप्रियतेच्या राजकारणासाठी मूलभूत विकासकामांना गालबोट लावलं जातंय.” तर काही सत्ताधारी नेत्यांनी भरणे यांच्या वक्तव्याला वैयक्तिक मत ठरवत, “लाडकी बहीण” योजनेचं समर्थन केलं आहे.
दत्तात्रय भरणे नेमकं काय म्हणाले?
“मी नेहमीच पाठपुरावा करत असतो. मी मुंबईत असू द्या, पुण्यात असू द्या किंवा कुठेही असू द्या, त्यातून माझ्या इंदापूर तालुक्याला सर्वाधिक निधी कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करत असतो. आज लाडकी बहिण योजनेमुळे निधी यायला थोडा उशीर होत आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निधी मिळण्यास उशीर झाला होता. पण आज सर्व हळूहळू गाडी सुरळीत झाली आहे,” असं भरणे यांनी म्हटलं.
दरम्यान, “लाडकी बहीण” ही योजना राज्यातील अनेक महिलांना आर्थिक आधार देणारी ठरली आहे. मात्र, योजनेसाठी इतर विकास योजनांचा बळी जात असेल, तर त्यावर गंभीर पुनर्विचार होणं आवश्यक असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.







