Yavat News यवत, ता. ५ : भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला गेलेल्या तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना यवत (ता. दौंड) परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. Yavat News
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री सुमारे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल ऑस्करवाडी शेजारील पान टपरीसमोर काही तरुणांमध्ये वाद सुरू होता. यावेळी प्रवीण नंदू दोरगे यांनी भांडण करू नका असे सांगत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संबंधित तरुण काही वेळासाठी तेथून निघून गेले. Yavat News

मात्र, काही वेळातच ते पुन्हा परत येत “आमच्या भांडणात मध्यस्थी का केली?” असा जाब विचारत दोरगे यांना शिवीगाळ व दमदाटी करू लागले. यावेळी यश दीपक मोहिते (रा. आमराई, बारामती) याने “आज तुला जिवंत सोडत नाही” अशी धमकी देत हातातील तलवारीने दोरगे यांच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत दोरगे यांनी वार हातावर झेलल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. Yavat News
यानंतर जीव वाचवण्यासाठी पळ काढत असताना अनिकेत केशवकुमार नामदास (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) याने दगडफेक केली. इतकेच नव्हे, तर एका अनोळखी कारचालकानेही दोरगे यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. Yavat News
या घटनेप्रकरणी प्रवीण दोरगे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, यश मोहिते, अनिकेत नामदास आणि अनोळखी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड करत आहेत.







