नागपूर : पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्न व विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यामध्ये पुरंदरमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी संकटामध्ये तात्काळ पिण्याचे पाणी व जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्याच्या मागणीसह इतर अनेक मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
यावेळी भाजपचे पुरंदर प्रभारी गंगारामदादा जगदाळे, सरचिटणीस गणेश मेमाणे, अशोक टेकवडे यांच्यासह दौंडचे आमदार राहुल कुल, जयकुमार गोरे यांनी हे निवेदन दिले. या निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात पुरंदर व जानाई उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहव्यात, खानवडी येथे सांस्कृतिक विभागाकडून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्यदिव्य पुतळा उभारणीबाबतही मागणी करणारे पत्र देण्यात आले.
याशिवाय, ऊरळीदेवाची व फुरसुंगी येथील नागरिकांचा नगरपालिका/महानगरपालिका याबाबतच्या अर्धवट व न्यायप्रविष्ठ बाबीमुळे नागरिकांचे निर्माण झालेल्या विविध प्रश्न व समस्यांचा त्वरित सोडवण्याबाबत मागणी करण्यात आली. तसेच विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणे, सासवड व जेजुरी नगरपालिका हद्दीतील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पाणी त्वरीत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली.