चाकण : चाकण औद्योगिक वसाहत परिसरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी आता चांगलीच कंबर कसली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांत ६२ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली. सहा जणांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली. दोघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली.
गेल्या काही काळात चाकण परिसरात झालेले खून, खुनाचा प्रयत्न व अन्य गंभीर घटनांमुळे पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. मनगटशाही आणि राजकीय पाठबळावर ठेके मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणारे देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चाकणमध्ये अनेकांवर गंभीर गुन्हे दाखल होऊनही काही गुन्हेगारांना कायद्याची कोणतीच भीती राहिली नसल्यासारखी स्थिती मागील काही काळात पहावयास मिळत होती. गुन्हेगारी करणाऱ्या युवकांचे ग्रुप आता संघटित गुन्हेगारीच्या माध्यमातून डोके वर काढू लागल्यानंतर चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व गुन्हे प्रकटीकरण शाखेने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत.
पोलीस प्रशासनाने तडीपारी, मोक्का, एमपीडीए कायद्याचे हत्यार उपसल्याने गुन्हेगारांना पळता भुई थोडी होणार आहे. गुन्हेगारी, युवकांच्या टोळ्यांची पाठ राखण आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांवर देखील पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.