पुणे : खंडित केलेली वीज जोडणी पुन्हा चालू करावी व वीज बिल ऑनलाईन करण्यासाठी ६,५०० रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी गंगा व्हिलेज शाखा, हडपसर उपविभागातील महावितरण कार्यालयातील कनिष्ठ कार्यालयीन सहायकावर (वर्ग-३) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सोहिल सुलेमान शेख (वय ४२) या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराने खरेदी केलेल्या फ्लॅटची वीज मीटर जोडणी कायमची खंडीत करण्यात आली होती. वीज मीटर पुन्हा चालू करण्यासाठी व वीज बिल ऑनलाईन चालू करण्यासाठी लोकसेवक सोहिल शेख यांनी ६,५०० रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
दरम्यान, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी (ता. २१) सापळा रचण्यात आला. त्यावेळी आरोपी शेख यांनी तक्रारदाराकडे खंडीत केलेला वीज मीटर पुन्हा चालू करण्यासाठी व वीज बिल ऑनलाईन चालू करण्यासाठी तडजोडीअंती ४,५०० रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्विकारली.
याप्रकरणी शेख यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.