हनुमंत चिकणे
लोणी काळभोर, (पुणे) : पुणे दौंड मार्गावरील सर्व लोकल रेल्वे गाड्या या तब्बल अर्धा ते १ तास उशिरा धावत असल्याने दैनंदिन कामगार, विद्यार्थी आणि व्यवसाय वर्गातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पुणे विभाग जर का फक्त बघ्याची भूमिका घेणार असेल तर पुणे स्टेशन येथे रेल रोको करण्याचा इशारा पुणे ग्रामीण प्रवासी ग्रुपच्या सदस्यांनी दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बारामती, पुणे दौंड, दौंड-पुणे, बारामती-पुणे अश्या लोकलने अंदाजे ८ हजार व त्यापेक्षा अधिक दैनंदिन कामगार, विद्यार्थी आणि व्यवसाय वर्गातील प्रवासी या मार्गावरून दररोज रेल्वे लोकलने या मार्गावरून प्रवास करतात. तरीदेखील या गाड्या रोज साधारण अर्धा ते १ तास उशिरा धावत आहेत. नव्याने सुरु करण्यात आलेल्या “वंदे भारत” मुळे देखील संध्याकाळच्या बारामती लोकलला १ तास उशिरा सोडण्यात येत असल्याची तक्रार प्रवासी करत असून पुणे दौंड मार्गावरील सर्व लोकल हे राम भरोसे चालत असल्याचा दावा येथील प्रवाशांनी केला आहे.
तर… सुपरफास्ट गाड्यांना असे अडचण कशी येत नाही ?
पुणे स्टेशनवरून लोकलला घोरपडी येथे सुमारे ३० मिनिटे उभे ठेऊन वेगळ्या मार्गावरून मालगाडींना पुढे सोडले जाते. तर कधी दौंडवरून गाडी वेळेत येऊन देखील भारत फोर्ज आणि घोरपडी आऊटर येथे थांबवून उशीर करण्यात येतो. जेव्हा प्रवासी संघटनेने या संदर्भात विचारणा केली असता, प्लॅटफॉर्मचा बहाणा दिला जातो, तर कधी गेटचा प्रश्न पुढे केला जातो. पण या लोकलना सोडता इतर सर्व एक्सप्रेस आणि आणि सुपरफास्ट गाड्यांना असे अडचण कशी येत नाही? असा सवाल सर्व संतप्त प्रवासी करत आहेत. याबद्दल अनेकदा तक्रार करूनही यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
प्रवासी संख्या कमी कशी ठरविली ? प्रवासी आक्रमक
स्थानिक आमदार, खासदार यांनी देखील वारंवार यांना सुचविले असता देखील हा त्रास सुरूच आहे. जेव्हा विचारले जाते तेव्हा प्रवासी संख्या कमी असल्याचे पुणे विभागातून सांगितले जाते. पण विशेषतः कोविड काळानंतर एकदाही तिकीट तपासणी अधिकारी पुणे-दौंड-बारामती मार्गावर फिरकले देखील नाहीत. तर यांना प्रवासी संख्या कळणार कशी ? अशी तक्रार पुणे ग्रामीण प्रवाशी ग्रुपचे मुख्य प्रमोद उबाळे, फारूक बागवान, सागर शेळके आदी प्रवासी करत आहेत. पुणे विभाग यावर तोडगा काढणार नसेल तर पुणे स्टेशन येथे रेल रोको करण्याचा इशारा दौंड तालुक्यातील प्रवाशांनी दिला आहे.
फेऱ्या वाढविण्याची प्रवाशांची मागणी
दौंड-पुणे या लोहमार्गावर लोकल ट्रेनने दैनंदिन प्रवास करणारा नोकरवर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच या मार्गावर लोकल ट्रेन हातावर मोजण्या इतक्या आहेत. यांमुळे लोकल ट्रेनमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अशा परिस्थितीत नागरिकांना गर्दीचा सामना करून प्रवास करावा लागत आहे. त्यातच लोकलचे टाईमटेबल बिघडले असल्याने नागरिकांची कामे व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे या मार्गावर लोकल ट्रेनच्या फेर्या वाढविण्यात याव्यात. अशी मागणी अनेक सामाजिक संघटना व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज” शी बोलताना पुणे ग्रामीण प्रवासी ग्रुपचे मुख्य प्रमोद उबाळे म्हणाले, “पुणे-दौंड लोकलने दररोज हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. या लोकल ज्या सुरु आहेत त्या वेळेवर आल्या पाहिजेत. यामध्ये अनेक नागरिक, प्रवासी, विद्यार्थी हे पिंपरी-चिंचवड, पुणे, शिवाजीनगर व लोणावळा परिसरात नोकरी, व्यवसायासाठी जात आहेत. शिवाजीनगरपर्यंत येत असलेल्या सर्वच्या सर्व लोकल हडपसर या ठिकाणी आणल्या तर ट्राफिकचा विषय संपून जाईल. सर्व नागरिकांना सोयीस्कर होईल. त्यामुळे सर्व लोकल वेळेवर सोडाव्यात.”