प्रतिनिधी: युनूस तांबोळी
शिरूर ( पुणे ): शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील टाकळी हाजी व इतर २५ गावात दरोडा व गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांना गुन्ह्याची तक्रार देण्यासाठी दूर असणाऱ्या पोलिस स्टेशला जावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय होऊन परिसरातील जनतेला वेळेवर पोलिसांची सेवा उपलब्ध होत नाही. गुन्हेगारी व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी टाकळी हाजी व इतर गावाला जवळ असणारे सुसज्य पोलिस स्टेशन निर्माण करावे. असे विधानसभा सदस्य आमदार दिलिप वळसे पाटील यांनी
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना नव्याने पत्र देऊन मागणी करण्यात आली आहे.
शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने टाकळी हाजी परिसरात नवीन पोलीस ठाण्याच्या स्थापनेचा सुधारित प्रस्ताव पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख यांनी मे २०२१ ला पोलिस महासंचालक यांच्या माध्यमातून शासनास पाठवला आहे. मात्र, तब्बल तीन वर्षे उलटली तरी अद्याप या प्रस्तावावर कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. या भागासाठी असणारे पोलिस निरीक्षक व कर्मचाऱ्यांना संपुर्ण तालुक्यातील गावावर लक्ष ठेवत असताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळीच पोलिस यंत्रणा पाठविण्यास विलंब होत असल्याचे दिसून येते.
टाकळी हाजी आणि आसपासच्या २५ गावांमध्ये मागील काही वर्षांत लुटमार, दरोडे, आर्थिक गुन्हे, महिलांवरील अत्याचार आणि अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सध्या या भागातील नागरिकांना शिरूर, शिक्रापूर किंवा रांजणगाव या लांबच्या पोलीस ठाण्यांमध्ये जावे लागते. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच, पण तातडीची मदत मिळण्यातही अडथळे येतात. याच पार्श्वभूमीवर, शिरूर, शिक्रापूर आणि रांजणगाव पोलीस ठाण्यांचे विभाजन करून टाकळी हाजी परिसरात नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करावी. असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता.
टाकळी हाजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मलठण, टाकळी हाजी, रावडेवाडी, सविंदणे, पिंपरखेड, कवठे येमाईसह २५ गावांचा समावेश होणार आहे. या भागात श्री मळगंगा देवी मंदिर (टाकळी हाजी), श्री येमाईदेवी मंदिर (कवठे येमाई) ही दोन मोठी कुलदैवतांची मंदिरे आहेत. राज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. त्यातून उन्हाळ्यात व पावसाळ्यात जगप्रसिद्ध रांजणखळगे कुंड पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी पर्यटक येत असतात. येथे पावसाळ्यात अपघात घडतात. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवावा लागतो.
नव्याने राज्य महामार्ग बेल्हा-जेजुरी, अष्टविनायक महामार्ग तसेच मलठण-कवठे येमाई-पारगाव-मंचर-भीमाशंकर हा मुख्य मार्ग जातो. या परिसरात दोन साखर कारखाने आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जाते. या ठिकाणी सातत्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. तसेच गेल्या काही दिवसांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. टाकळी हाजी ला अहिल्यानगर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने अहिल्यानगर आणि पुणे या मोठ्या शहरांमधील गुन्हेगारांचा या भागातून वावर असल्याने पोलिसांना वारंवार नाकाबंदी करावी लागते.
नवीन पोलिस ठाणे आवश्यक असल्याचे शासनाच्या वारंवार निदर्शनास आणून दिले जात आहे.आमदार दिलिप वळसे पाटिल व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात अनेक विकास कामे झाली आहेत. त्यातून रस्ते, विज, पाणी तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात आले आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने या पुढील काळात या परिसरात स्वतंत्र पोलिस स्टेशन व्हावे. यासाठी वळसे पाटिल यांनी मुख्यमंत्री यांना पत्राव्दारे मागणी केली आहे.