राजू देवडे
लोणी धामणी : आंबेगावच्या पूर्व भागात वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, अनेक गावांचा पाणी पुरवठा हा उजव्या कालव्याला येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यात पाणी सोडावे, अशी मागणी खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळूंज व जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे यांनी केली.
बदलत्या हवामानामुळे विहीर, तलाव कुपनलिकांमधील पाण्याच्या पातळीत कमालीची घट होताना दिसत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पिके सुकत असून, त्यांना पाण्याची गरज आहे. काही ठिकाणी शेतकरी कांदा लागवड करावी का, या विवंचनेत पडला आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणी पातळी कमी झाल्याने डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याला लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी मागणी या भागातील शेतकरी करू लागले आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. सरकारने अनेक तालुके दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. आंबेगाव तालुक्यातही तीच परिस्थिती असून, सध्यस्थितीत शेतात असलेल्या पिकांना पाण्याची गरज आहे.