पुणे : अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी वाहन परत देण्यासाठी मदत करतो असे सांगून तब्बल ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या लोकसेवकाला रंगेहाथ पकडण्यात मंचर पोलिसांना यश आले. हा प्रकार शनिवारी (ता. २३) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ घडला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, याप्रकरणी संतोष सुरेश साळुंखे (वय ४४), संदीप भीमा रावते (वय ३६) यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराला त्याची अपघाताच्या गुन्ह्यातील दुचाकी वाहन परत देण्यासाठी मदत करतो म्हणून ४० हजार रुपयांची लाचेची मागणी लोकसेवकाकडून करण्यात आली. याबाबतची तक्रार दिल्यानंतर तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. २३) पडताळणी करण्यात आली.
यादरम्यान, तक्रारदाराचे काम करून देण्यासाठी लोकसेवकाने ४० हजार रुपयांवरून ८ हजार रूपये तडजोडीअंती घेण्याचे कबूल केले. लाचेची रक्कम लोकसेवक संदीप रावते यांनी पंचांसमक्ष स्वीकारली. त्यावेळी दोन्ही लोकसेवकांना रंगेहाथ पकडण्यात आले.
मंचर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटजवळ, सिद्धी हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.
लाचलुजपत प्रतिबंधक विभागाचे पुणे परिक्षेत्र पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. कोणी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तत्काळ आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या वेळी पेलिसांनी केले.