पुणे : भारतात जानेवारी ते फेब्रुवारी यादरम्यान उत्तरेकडील देशातील मुख्यत: ग्रीनलँड, नॉर्वे, कॅनडा, स्वीडन, उत्तर चीन, दक्षिण अमेरिका, अलास्का, मंगोलिया, मध्य आणि दक्षिण आफ्रिका या देशांतून अडीचशेहून अधिक प्रकारचे पक्षी मुक्कामाला येतात. यातील अनेक पक्ष्यांचा मुक्काम महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या पाणवठ्यावर किंवा माळरानावर असतो. येणारे हजारो परदेशी कवडीगाव (ता. हवेली) येथील मुळा-मुठा नदीत येतात. मात्र, येथील पक्ष्यांचे पसंतीची पाणथळ जागा देखभाल, दुरुस्तीअभावी दुरावस्थेत असल्याने त्यांचा ‘आधार’च निराधार झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्ष्यांनी आता या ठिकाणाहून पाठ फिरविली आहे.
स्थलांतर ही पक्ष्यांची प्राचीन परंपरा आहे. सातत्याने चालणारी ही एकप्रकारची साखळीच आहे. स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांसाठी लांब पल्ल्याचा प्रवास हा काय तसा नवा नाही. पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण म्हणजे अन्नाचा तुटवडा. उत्तरेकडील प्रदेश बर्फाच्छादित झाला की, पक्ष्यांना अन्न मिळणे कठीण होते. छोट्या झुडपांसह मोठी झाडेदेखील बर्फाखाली झाकली जातात. या काळात अन्नासाठी पक्ष्यांना मोठा संघर्ष करावा लागतो. हजारो किलोमीटरचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हजारो पक्षी स्थलांतर करून भारतात येत असतात. हे देखील आता नवीन नाही.
जैवविविधतेने परिपूर्ण असलेल्या महाराष्ट्रात दरवर्षी परदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. हे पक्षी बहुतांश पाणपक्षी असतात. त्यातही बदक वर्गातील पक्ष्यांचे प्रमाण अधिक असते. नदी, तलाव परिसरात त्यांचे थंडीच्या दिवसात वास्तव्य असते. कवडीगाव, उजनी जलाशयात त्यांची पक्ष्यांसाठी ही ठिकाणे उत्तम आश्रयस्थळे आहेत. परंतु पावसाचे कमी प्रमाण, पुणे शहरातील राडारोडा व पाण्यावरील जलपर्णी या समस्येने कवडीगाव येथील नदीपात्र झाले आहे. त्याचा परिणाम पक्ष्यांवर होत आहे.
नदीपात्रात आश्रयासाठी येतात विविध प्रकारचे पक्षी
नदीपात्रात या हंगामात विविध प्रकारचे अनेक पक्षी आश्रयासाठी येतात; परंतु काही कारणांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यासाठी ते आपले आश्रयस्थान बदलतात, असंख्य प्रमाणात दिसणारे बदकवर्गीय पक्षी सध्या दिसेनासे झाले आहेत. अगदी नगण्य पाणपक्षी थोड्याफार पाण्यावर आपली उपजीविका करतात; परंतु सर्रास दिसणारे पाणपक्षी जरी कमी झालेले असले, तरी नको असलेल्या पक्ष्यांची संख्या वाढत चाललेली आहे. असंख्य प्रमाणात घारींचा थवा कवडीगावाच्या नदीपात्रात फिरत आहे, तसेच शेकडोंच्या प्रमाणात कांडेसर करकोचे व पांढरे शराटी दिसून येतात.
…ही तर धोक्याची घंटाच
काही चित्रबलाक पक्ष्यांनी आपला विणीचा हंगामसुद्धा उरकला आहे. नियमित दरवर्षी येणाऱ्या पक्ष्यांसाठी खरे तर ही धोक्याची घंटाच आहे. ऋतुचक्र बदलत आहे, त्याचप्रमाणे निसर्गसुद्धा बदलत आहे. पक्ष्यांचे आश्रयस्थान धोक्यात आले तर ते दुसरा आसरा शोधतात; परंतु, नवीन ठिकाणी त्यांना अनेक धोक्यांना सामोरे जावे लागते. उजनी धरणात असलेला अपुरा पाणीसाठा, भादलवाडी तलावातील थाटत असलेली पक्ष्यांची वसाहत सध्या ओस पडली आहे. कदाचित, त्यातील बहुतांश चित्रबलाक, कांडेसर करकोचे व पांढरे शराटी हे कवडीगाव या क्षेत्राकडून दुसरीकडे वळल्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने पक्ष्यांच्या वास्तव्याची काळजी घ्यावी
कवडीगाव नदीपात्र हे असंख्य पाणपक्ष्यांसाठी उत्तम आश्रयस्थान आहे. येथील मुळा मुठा नदीच्या पलीकडे कुरन (२०-३० वर्षांपूर्वीच्या झाडांचे संवर्धन केले जाते) आहे. नदी व खूप नैसर्गिक संपन्नता असल्यामुळे गावामध्ये हिवाळ्यात वेगवेगळे पक्षी स्थलांतर करून काही महिन्यासाठी येतात. त्यामुळे हे गाव पक्षीनिरीक्षण केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पक्षांना भरपूर प्रमाणात खाद्यान्न मिळते. परंतु, यावर्षी परिसराची त्याच गेली आहे. यामुळे जैवविविधतेच्या संवर्धनासाठी पक्ष्यांच्या वास्तव्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे.
– नितीन टिळेकर, पक्षीप्रेमी, कदमवाकवस्ती, ता. हवेली.