उरुळी कांचन, (पुणे) : खडकवासला नवा मुठा उजवा कालव्यातून पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचनसह परिसरात पाणी पिण्यासाठी वापरले जाते. मात्र, या कालव्याच्या शेजारी राहणारे परिसरातील पशुपालक व काही नागरिक या पाण्यात गायी व म्हैस या जनावरांची लहान मृत वासरे या पाण्यात टाकून विल्हेवाट लावत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवा मुठा उजवा नवीन कालव्यातील पाण्याचा वापर पूर्व हवेलीतील 10 ते 12 गावातील नागरीकांची तहान भागवण्यासाठी व शेतीसाठी करीत आहेत. परिसरातील अज्ञातांकडून मेलेली जनावरे टाकण्यात येत असल्यामुळे परिसरात राहणाऱ्या वस्तीमध्ये दुर्गंधी पसरून येथील रहिवाशांना घरात राहणे मुश्किल झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कालव्यात मृत जनावरे आढळत असून प्रशासनाने या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिणामी, पाळीव गाय अथवा म्हैस या जनावरांची लहान मृत वासरे कालव्यात टाकणे सुरू झाले आहे.
कालव्यात नेहमीच मेलेली जनावरे टाकण्यात येतात. ओढ्याच्या लगत म्हशींचे व गायींचे गोठे आहेत. यातील गोठ्यांचे मालक ओढ्यात मेलेली जनावरे टाकत असल्याची शंका परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. तसेच परिसरातील अज्ञातांकडून कुत्री, मांजर, कोंबड्यासुद्धा मेल्यानंतर ओढ्यात टाकण्यात येतात. मेलेली जनावरे टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, विकृत व्यक्तींच्या या कारस्थानामुळे पाणी प्रदूषित होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या विकृत प्रवृत्तींना पाय बंद घालणे आवश्यक आहे. कालवा परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सजग राहून या विकृत लोकांची माहिती उरुळी कांचन ग्रामपंचायत कार्यालयात द्यावी. माहिती देणाऱ्याला योग्य बक्षीस देऊन त्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती सरपंच अमित (बाबा) कांचन व ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे यांनी दिली.