पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पुणेकरांची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी रविवार असल्याची पर्वणी साधत ‘होऊ दे पार्टी’च्या मूडमध्ये खवय्यांनी मटण आणि चिकन घेण्यासाठी सकाळपासूनच दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या. कोणी मित्रांसोबत, तर कोणी कुटुंबीयांसोबत आजचं सेलिब्रेशन करणार आहे. मटणाचे दर तब्बल ७०० रुपये किलो असताना देखील पुणेकर मोठ्या उत्साहाने मटण, चिकन आणि मासे पार्टीची जोरदार तयारी करत आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्यामुळे पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून पुण्यातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. एमजी रोड, एफ सी रोड, जे एम रोड संध्याकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या तीनही मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी होत असल्याने नागरिकांना कुठलाही मनस्ताप होऊ नये यासाठी वाहतूक शाखेने हा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील ‘या’ रस्त्यांवरप्रवेश बंद
– एम जी रोड : महात्मा गांधी रस्त्यावरील १५ ऑगस्ट चौक ते अरोरा टावर्स चौक दरम्यान वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
– एफ सी रोड : फर्ग्युसन रस्त्यावरील गोखले स्मारक चौक ते फर्ग्युसन महाविद्यालय प्रवेशद्वारापर्यंत वाहनांना ‘नो एंट्री’ असणार आहे.
– जे एम रोड : जंगली महाराज रस्त्यावर होणारी गर्दी विचारात घेऊन झाशीची राणी चौकातून वाहतूक बंद असणार आहे.
आज सर्वत्र जल्लोषी वातावरण दिसत असून, हॉटेल्स, पबमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत लाइव्ह म्युझिक बॅण्ड अन् डीजेच्या तालावर थिरकत नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. मुळशी, लोणावळा, सिंहगड परिसर, पानशेत, भोर या शहरालगतच्या हॉटेल, रिसॉर्ट, बंगले, लॉजिंगचे बुकिंग झाले आहे. सर्वच ठिकाणी लाइव्ह म्युझिक बँड, डीजे नाइटसह विविध खाद्यपदार्थांसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, दुसरीकडे पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील चौका-चौकात पाहायला मिळत आहे.