Daund रावणगाव (ता. दौंड) : येथील शेतकर्याचा एक एकर ऊस जळून मोठे आर्थिक नुकसान झाले. महावितरण कंपनीच्या जीर्ण झालेल्या तारा तुटल्याने ऊसाच्या फडाला आग लागली. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी (दि.26) दुपारी तीन वाजता घडली.
तीन एकर 265 जातीचा ऊस
याप्रकरणी शेतकरी तुषार शिवाजी आटोळे यांनी महावितरणकडे भरपाईची मागणी केली आहे. आटोळे यांच्या रावणगाव येथील गट नं. 772 मध्ये तीन एकर 265 जातीचा ऊस असून, बुधवारी दुपारी तारांचे घर्षण होऊन तारा उसाच्या शेतात पडल्याने उसाला आग लागली. त्यात तीन एकर उसापैकी एक एकर ऊस खाक झाला. उसाबरोबर ठिबक सिंचन साहित्य व जलवाहिनीचे देखील नुकसान झाले.
येथील ग्रामपंचायत सदस्य विकास आटोळे, गोरख रांधवण, अमित आटोळे व इतर ग्रामस्थांनी तातडीने उसाला लागलेली आग नियंत्रणात आणल्याने इतर ऊस वाचला. या घटनेत तुषार आटोळे यांचे दोन लाख रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाले. घटनेनंतर महावितरणचे कुरकुंभ येथील अभियंता शरद अवताडे यांनी तातडीने पाहणी करून पंचनामा करण्यास सांगितले.
रावणगाव परिसरात मागील 50 वर्षांपासून मुख्य वीजवाहिनी असणार्या खांबांवर जीर्ण झालेल्या तारा असल्याने त्या तुटून अनेकदा छोट्या-मोठ्या अपघाती घटना घडल्या आहेत. बुधवारच्या घटनेत तारा तुटलेल्या जागेवर अर्धा फूट खोल खड्डा झालेला दिसून आला. या परिसरातील तारा बदलण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.