दौंड, (पुणे) : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, समाजकंटकांसह गुन्हेगारांवर वचक राहून निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (ता. ०४) रूट मार्च काढण्यात आला.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) यांच्यासह दौंड पोलीस ठाणे ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, खाटीक गल्ली, गांधी चौक, आलमगीर मशीद, कुंभार गल्ली, नेहरू चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संविधान चौक असा रूट मार्च काढण्यात आला.
आगामी लोकसभा निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलिस दल सज्ज आहे, असा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला. कुरकुंभ ग्रामपंचायत हद्दीतील महाराष्ट्र बँक, आई फिरंगाई माता चौक ते कुरकुंभ चौकी असा रूट मार्च घेण्यात आला. यावेळी सीआयएसएफ चे 2 अधिकारी ५५ जवान तसेच दौंड पोलीस स्टेशन कडील एक पोलीस निरीक्षक, तीन अधिकारी व पंचवीस कर्मचारी यांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता. तसेच पोलीस स्टेशनकडील चार सरकारी वाहने रूट मार्चमध्ये सहभागी झालेली होती.