दौंड, (पुणे) : संक्रातीतील पतंगबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजामुळे नागरिक, तसेच पक्ष्यांना गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडल्या आहेत. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना छुप्या पद्धतीने मांजा विक्री करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नायलॉन मांजाची रिळे जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई जगदाळे वस्ती व शालीमार चौकात मंगळवारी (ता. 14) दुपारी करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986च्या कलम 5 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
प्रज्वल राम बनसोडे (वय-21, रा. जगदाळे वस्ती, दौंड, ता. दौंड) व मनोज सुभाष नय्यर (वय-43,रा. शालीमार चौक, ता. दौंड) असे कारवाई करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यातील प्रज्वल बनसोडे याच्या ताब्यातील 5 हजार रुपये किमतीचा 10 नॉयलॉन मांजा, तर नय्यर यांच्याकडून 3 हजार रुपयांचे 6 मंजाचे रोल असा एकूण 8 हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी नितीन बोराडे व पवन माने यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतंग उडविण्यासाठी तयार करण्यात येणारा नॉयलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापर बंदी बाबत शासनाने आदेश जारी केलेले आहेत. पोलीस नॉयलॉन मांजाची तपासणी करीत असताना प्रज्वल बनसोडे व मनोज सुभाष नय्यर हे दोघे मांजा विक्री करीत असतांना मिळुन आले.
दरम्यान, सदरचे नॉयलॉन मांजा एका खाकी पुठ्ठ्याचे बॉक्समध्ये पॅक करून त्यावर पोलीस व पंचाच्या सहीचे कागदी लेबल लावुन त्यावर पोलीस ठाण्याच्या शिक्क्याचे लाखेचे सील करून पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी पंचनामा केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर पर्यावरण (सरंक्षण) कायदा 1986च्या कलम 5 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार जाधव व गायकवाड करीत आहेत.