दौंड, (पुणे) : पैसे चोरल्याच्या संशयावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धारदार ब्लेडने एकाच्या गळ्यावर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी अवघ्या 5 तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. शुक्रवारी (ता.14) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ (ता. दौंड) गावच्या हद्दीत शेवाळे प्लॉट येथे सुनिल भागवत यांच्या रूमवर हि घटना घडली आहे.
विमलेश भगीरथी असे गंभीर वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. जखमीवर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असून तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
बंटी कारू मांझी (रा. सुनिल भागवत यांचे रूमवर शेवाळे प्लॉट, कुरकुंभ ता. दौंड, मूळ रा. अलीपुर गांगटी, जि. गया, राज्य बिहार) असे वार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रिजवान मौलादीन मुलाणी (वय 45, व्यवसाय लेबर काॅन्टेक्टर रा. कुरकूंभ ता. दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंटी कारू मांझी व विमलेश भगीरथी हे दोघेजण एकाच रूमवर राहतात. शुक्रवारी (ता.14) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास बंटी मांझी याचे पैसे चोरल्याच्या संशयावरून विमलेश भगीरथी यास शिवीगाळ दमदाटी करत लाथाबुक्कयांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत मांझी याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारधार ब्लेडने विमलेश भगीरथी यांच्या गळ्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, आरोपी मांझी हा गुन्हा केल्यावर फरार झाला होता त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी 3 तपास पथके तयार केली होती. आरोपी हा परप्रांतीय असल्याने दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन वरून पळून जात असताना अवघ्या 5 तासामध्ये दौंड पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (ता. 17) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.