पुणे : जन्मदात्री आईच शत्रू ठरल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईने दोन वर्षाच्या मुलीसह एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या करून नवऱ्यावरही धारदार शास्त्राने मानेवर आणि डोक्यावर वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गाव हादरले असून गावातील शिंदे वस्तीवर लोकांची गर्दी जमली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शिंदे वस्तीवर दुर्योधन बाबासाहेब मिंडे यांचे घर आहे. या घरी आज एकाच वेळी आईनेच दोन वर्षाच्या मुलीची व एक वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केली, तसेच तिने धारदार शास्त्राने नवऱ्याच्या मानेवर आणि डोक्यावर वार केले. तिला एकाच वेळी सर्व घर संपवायचा हेतू असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.
या घटनेत हल्लेखोर महिलेचे पती दुर्योधन बाबासाहेब मिंडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना बारामतीतील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर दोन वर्षाची पियू दुर्योधन मिंडे व दोन वर्षाचा शंभू दुर्योधन मिंडे या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. या दोघांचाही गळा दाबून खून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंडे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.