Daund News : दौंड : वरवंड (ता. दौंड) येथील नेमचंद गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा वनविभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून करण्यात आला होता. २७ मार्च २०२२ रोजी घडलेल्या या खून प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसत आहे. गांधी खून प्रकरणाचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. हे प्रकरण संपवण्यासाठी मला १५ लाख रुपये रोख द्या, अशी मागणी वरवंड येथे राहणाऱ्या व पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांनी केल्याची तक्रार यवत पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. यामुळे या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू झाला आहे.
प्रकरण दाबण्यासाठी १५ लाखांच्या लाचेची मागणी
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सागर गोविंद शिंदे (रा. वरवंड) असे या आरोपीचे नाव असून, हा पुणे शहर पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई आहे. वरवंड येथे वहिनीचे वडील नेमचंद गांधी यांचा २७ मार्च २०२२ रोजी राकेश भंडारी, प्रणय राजेंद्र भंडारी, विजय राजाराम मंडले , अतुल अशोक जगताप यांनी वन विभागाच्या हद्दीत नेऊन गळा दाबून खून केल्याची घटना घडली होती. (Daund News ) मात्र, या आरोपींनी गांधी हे घरात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला होता. मात्र, एका कथित व्हिडिओमुळे त्यांनी एक वर्षापूर्वी केलेल्या या खुनाचे बिंग फुटले आहे.
दरम्यान, सध्या हे आरोपी येरवडा कारागृहात असून, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणात हा कथित व्हिडिओ माझ्याकडे असल्याची बतावणी करत, १५ लाखांच्या मागणीसाठी एक पोलीस ब्लॅकमेल करीत असल्याचे आता समोर आले आहे. (Daund News ) या प्रकरणी राहुल चयनलाल भंडारी (वय ४४, व्यवसाय पेपर एजन्सी रा. वरवंड, शिवाजी चीक ता. दौंड जि. पुणे) यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फीर्यादीनुसार, सागर शिंदे या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर शिंदे हा २४ जुलै २०२३ रोजी आरोपी राकेश भंडारी याच्या घरी येऊन ठरल्यानुसार माझे १५ लाख रुपये दे, असा हट्ट करू लागला. एवढे पैसे कशाचे, अशी विचारणा राहुल याने भावाला केल्यानंतर देखील त्याने नेमके कारण सांगण्यास टाळाटाळ केली.
दरम्यान, राकेश भंडारी याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या वरवंड येथील शाखेतून ९ लाख रुपयांची एफ.डी. मोडुन पैसे घरी आणले. त्यानंतर उत्सुकतेपोटी भाऊ राहुल याने पुन्हा पुन्हा खोदून विचारणा केली. त्यानंतर राकेशने सर्व गोष्टींचा उलगडा केला. (Daund News ) तुझे सासरे नेमीचंद गांधी यांचा खून केल्याचा व्हिडीओ माझ्याकडे असल्याचे सांगत मला तो बॅकमेल करत आहे. पैसे न दिल्यास घरातील सर्वांना खुनाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी तो देत असल्याचे स्पष्टीकरण राकेशने भाऊ राहुल याला दिले. त्यानंतर भंडारी कुटुंबियांनी घाबरून सागर शिंदे याला गावातील गोपीनाथ मंदिरासमोर ८ लाख रुपये रोख खंडणी स्वरूपात दिले.
दरम्यान, घडलेल्या घटनेची फिर्याद राहुल भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात दिली. या प्रकारानंतर सागर शिंदे याच्यावर खंडणीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Daund News ) या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करीत आहेत.
सागर शिंदे हा पोलीस कर्मचारी असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. या खुनाच्या घटनेतील आरोपी अटक झाल्यापासून सागर शिंदे हा फरार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : राजेश्वर सोसायटीच्या अध्यक्षपदी मधुकर जामले तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब ढेंबरे बिनविरोध