दौंड (पुणे) : ‘तुम्हाला जर कुणाकडून मानसिक, शारीरिक त्रास होत असेल, दबाव आणला जात असेल, तर न घाबरता बिनधास्त पोलीस ठाण्यात तक्रार करा. त्रास देणाऱ्यांवर तत्काळ कडक कारवाई करू आणि तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवण्यात येईल. तुम्हाला सुरक्षित व निर्भय ठेवण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यतत्पर आहोत, असे प्रतिपादन दौंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले.
दौंड तालुक्यातील भीमथडी शिक्षण संस्थेच्या स्व. किसनदास गुलाबचंद कटारिया महाविद्यालयात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी ‘कायदा, सुव्यवस्था व सबलीकरण’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी यादव बोलत होते.
या वेळी संस्थेचे मानद सचिव प्रेमसुख कटारिया, अध्यक्ष विक्रम कटारिया, प्राचार्य डॉ. सुभाष समुद्र, जोतीप्रसाद विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रमोद काकडे, गीताबाई बंब इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री पाटील, प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी बोलताना चंद्रशेखर यादव म्हणाले, ‘सोशल मीडियावर अनेक फसवणुकीचे प्रकार सुरु आहेत. सायबर क्राईमला बळी पडू नका. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध रहा. बाका प्रसंग ओढवल्यास तत्काळ कळवा. महाविद्यालयीन युवतींनी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व घरापासून महाविद्यालयापर्यंत येताना कुणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर येऊन तक्रार करा.’ या वेळी मुला-मुलींना कायद्याचे ज्ञान मिळावे यासाठी विविध कलमे व दंड संहितेची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन दौंड पोलीस ठाण्याचे पांडुरंग थोरात व महाविद्यालयाचे श्रीकृष्ण ननवरे यांनी केले होते.
शाळा-महाविद्यालयात जाऊन मुलींना कायद्याचे धडे…
मुली-महिलांना त्रास होऊ नये, त्यांना असुरक्षित वाटू नये, त्यांना चांगले जीवन जगता यावे, यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे ज्या पोलीस ठाण्यात काम करतात तेथील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन मुलींना कायद्याचे धडे देत आहेत. त्यांना निर्भय बनवत आहेत. त्यामुळे त्रास सहन करणाऱ्या असंख्य विद्यार्थिनी थेट यादव यांना आपल्या तक्रारी सांगतात. यामुळे कित्येक महिला-मुली निर्भयपणे जीवन जगत आहेत.