गणेश सुळ
Daund News केडगाव : दिव्यांगांना आपली स्वतःची राहती घरे विकून घरपट्टी भरायची का? ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट दौंड नगरपालिकेने केली आहे. (Daund News) असा आरोप प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांनी केला आहे. (Daund News)
प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर मंत्री यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी दिव्यांगासाठी घरपट्टी व पाणीपट्टी पूर्णपणे माफ करावी तसेच इतर नागरिकांसाठी पूर्वीची घरपट्टी आहे तीच घरपट्टी आकारावी त्यात वाढ करू नये. असे निवेदन मंत्री यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष टेंगले यांना दिले आहे. यावेळी अनिल गुजर, कलीम तांबोळी, शहनाज शेख, सुवर्णा सोनवणे,रेणुका चव्हाण, सविता चव्हाण, संगिता हिरणवळे,चांदणी हमजे खान,प्रल्हाद रणधीर उपस्थित होते
पुढे बोलताना रामेश्वर मंत्री म्हणाले कि, जगात कोरोनाने थैमान घातले होते. तीन वर्षांपूर्वी कोरोना सदृश्य स्थिती होती. त्यातच धंदे, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे पूर्वीची घरपट्टी आहे. तीच घरपट्टी भरणे सुध्दा शक्य नाही आणि त्यातच आपण वाढीव घरपट्टीचा बोजा दिव्यांगाचा विचार न करता लादला आहे. ही घरपट्टी वाढ सरसकट सर्व लोकांना लागू केली आहे. शासनाने सर्व ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांगासाठी घरपट्टी व पाणीपट्टी माफ केलेली असताना मात्र दौंड नगरपालिकेने दिव्यांगासाठी सरसकट घरपट्टी तीही वाढीव घरपट्टी लागू केली आहे.
दरम्यान, दिव्यांगाना किमान रोजगार उपलब्ध केला नाही. त्यामुळे दिव्यांगापुढे आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना त्यांनी घरपट्टी कशी काय भरायची, शासनाने दिव्यांगासाठी जिल्हास्तर, ग्रामपंचायत, पंचायत समिती यांच्याकडे ठराव करून घरपट्टी व पाणीपट्टी माफ केली आहे. याचा विचार होवून त्याप्रमाणे दौंड नगरपरिषदेने शहरातील दिव्यांग व्यक्तींसाठी तसा ठराव करावा,अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने यावेळी करण्यात आली.
दौंडमधील नागरिकांच्या समस्या
वास्तविक दौंड च्या नागरीकांना रस्ता, लाईट, पाणी याच सुविधा व्यवस्थित मिळणे मुश्किल झाल्या आहेत. तसेच दौंड नगरपालिका एक दिवसा आड पाणी पुरवठा याद्वारे सहा महिने पुरवठा करून पूर्ण वर्षांची पाणीपट्टी आकारते. त्यातही काही वेळेस काही ठिकाणी कमी दाबाने पाणी येते तर काही ठिकाणी येतच नाही.