दौंड(पुणे): ॲग्रीस्टॅग योजने अंतर्गत दौंड तालुक्यातील शेतकरी ओळख क्रमांक काढण्याचे कामकाज महसूल खात्याच्या वतीने अतिशय जोमाने सुरू आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला व दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांच्या अचूक नियोजनतून दौंड तालुक्यातील शेतकरी बांधवांचे ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत ओळख क्रमांक काढणे कामकाज प्रगति पथावर आहे.
तालुक्यात 50 हजार शेतकऱ्यांची नोंदणी
तालुक्यातील एकूण खातेदारांपैकी बिगर शेती व लागवडी अयोग्य क्षेत्र धारक खातेदार वगळता शेतकरी ओळख क्रमांक काढण्यासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची संख्या अंदाजे एक लाख पर्यंत आहे. यापैकी निम्म्या म्हणजेच 50 हजार शेतकरी बांधवांचे ओळखपत्र क्रमांक काढण्यासाठी आवश्यक नोंदणी आज दि. 14 रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
दौंड तालुक्यातील महसूल विभागाने सुरुवातीला महा-ई सेवा केंद्र, आपले सरकार केंद्र, ग्राहक सेवा सुविधा केंद्र यांच्या बैठका घेऊन गावनिहाय नियोजनपूर्वक शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त नोंदणी करण्यात यश मिळवले आहे. सुरुवातीला राज्य स्तरावरील कृषी विभाग यांची असहकार्यची भूमिका सध्या मवाळ झाली असून कृषी सहाय्यक, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामपंचायत अधिकारी एकत्रित या योजनेचे काम करीत असल्याने उर्वरित नोंदणी जलद गतीने होणे शक्य होईल.
अनुदान व इतर शासकीय लाभासाठी ॲग्रीस्टॅग नोंदणी आवश्यक
पीएम किसान दुष्काळ अनुदान, पाऊस अनुदान, पिक विमा व इतर कोणताही शासकीय लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅग योजनेअंतर्गत ओळखपत्र महत्त्वाचे ठरणार असून उर्वरित सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या ग्राहक सुविधा केंद्र अथवा ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहायक यांना संपर्क करून आपला शेतकरी ओळख क्रमांक काढणे अत्यावश्यक आहे.
शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक महत्वाचा
भविष्यात शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या संबंधित शासन स्तरावर नियोजन करण्यासाठी ॲग्रीस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक अतिशय महत्वाचा टप्पा ठरणार असून सर्व शेतकरी बांधवांनी शेतकरी ओळख क्रमांक काढून स्मार्ट शेतकरी व्हावे. तसेच पाणंद रस्ते संबंधित सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरीय समित्यांच्या माध्यमातून वाद विवाद मिटवून रस्ते खुले करण्यासाठी पुढाकार घ्यावा. असे आवाहन उपविभागीय अधिकारी मीनाज मुल्ला यांनी सर्व शेतकरी बांधवांना केले आहे.