लोणी काळभोर, ता. 14 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी निघालेल्या एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील राजेंद्र पेट्रोल पंपासमोर गुरुवारी (ता.13) सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांना 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
फैसल नेकमोहंमद अन्सारी (वय 28 रा. पांढरस्थळ उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार राहुल कर्डिले यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कर्डिले हे नेहमीप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावरून अवैध हातभट्टी दारूची दुचाकीवरून वाहतूक होणार आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी माळी मळा परिसरातील राजेंद्र पेट्रोल पंपासमोर सापळा रचला. तेंव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक हिरो होंडा कंपनीची गाडी पकडली. त्या गाडीवर ३ कॅन्डमध्ये 105 लीटर दारु मिळून आली आहे. त्यानंतर पोलिसांनी गाडीसह सुमारे 55 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दरम्यान, आरोपी फैसल अन्सारी याला अटक करून त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमन कलम ६५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल जाधव, प्रदीप गाडे, पोलिस हवालदार दादा हजारे, पोलीस अंमलदार राहुल कर्डिले, बाजीराव वीर, सुरज कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.