गणेश सुळ
Daund News : केडगाव : देशाची सेवा करत असताना शहीद झालेल्या सैनिक भागवत बागडे (रा. धोंदेवडी,तालुका. खटाव,जिल्हा . सातारा) यांच्या पत्नीने जिद्दीने संकटावर मात करत पुणे ग्रामीण पोलिसाची नोकरी मिळवली आहे. अजिता सुदाम पोटे (राहणार.पारगाव, तालुका. दौंड,जिल्हा . पुणे) असे या वीरपत्नीचे नाव आहे.
अजिता यांचे लहानपण अतिशय संघर्षामध्ये गेले, त्या 6 वर्षाच्या असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर चुलते विनायक पोटे यांनी त्याचा सांभाळ केला. अवघ्या वयाच्या 19 व्या वर्षी त्यांचा विवाह सैनिक भागवत बागडे यांच्याशी 2011 साली झाला. (Daund News) चौदा वर्षे देशसेवा केल्यानंतर 6 एप्रिल 2017 रोजी कारगिल येथे ऑन ड्युटी असताना ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भागवत यांचा आकस्मित मृत्यू झाला. यावेळी अजिता यांचा मोठा मुलगा तन्मय 3 वर्षाचा तर लहान मुलगा हर्ष 1 वर्षाचा होता.
खचून न जाता केले ध्येय साध्य
पतीच्या मृत्युमुळे अजिता यांच्यावर अक्षरशः आभाळ कोसळले, परंतु खचून न जाता त्यांनी पतीच्या पश्चात देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. 2018 साली वयाच्या पंचविसव्या वर्षी बारावी पूर्ण केली. मुलांना पुणे याठिकाणी मिलीटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळवला.
अजिता यांनी स्वतः यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मार्फत एस एम जोशी महाविद्यालयात पदवी पूर्ण केली. गेली एक वर्षभरापासून त्यांनी पारगाव येथे मार्गदर्शक विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीसाठी मैदानी कसून सराव केला. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीमध्ये घवघवीत यश मिळवले. (Daund News) कुठल्याही अकॅडमीचे मार्गदर्शन न घेता ग्राउंड व लेखीमध्ये अजिता यांनी यश संपादन केले आहे.
याबाबत बोलताना अजिता म्हणाल्या की, नियतीने मला हरवायचा प्रयत्न केला. 15 जानेवारी रोजी पोलीस भरतीसाठी ग्राउंडची परीक्षा होती. त्याच्या आदल्या दिवशी माझे मोठे बंधू केशव पोटे यांचे आकस्मिक निधन झाले. (Daund News) सदर दुःखाचा डोंगर बाजूला सारत अजिता यांनी दुसऱ्या दिवशी परीक्षा दिली व यश संपादन केले.
लहानपणापासून देशसेवेची आवड होती. पतीच्या मृत्यूनंतर भरपूर संकटाना सामोरे जात गाव सोडून पुणे येथे स्वतः क्वार्टर मध्ये राहून मुलांना इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. (Daund News) भविष्यात नोकरीच्या रूपाने देशसेवा करून मुलांना अधिकारी बनवायचा प्रयत्न करणार आहे. शासन भरतीचे पोलीस म्हणून मिळालेले पद हे पती माझी सैनिक भागवत बागडे यांना समर्पित करते.
दरम्यान, अजिता यांनी मिळविलेल्या यशाबद्दल पारगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. (Daund News) यावेळी बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, पंचायत समितीचे सभापती सयाजी ताकवणे, नामदेव ताकवणे, नाना जेधे, सुभाष बोत्रे, सोमनाथ ताकवणे, हरिदास बोत्रे, किसान जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.