गणेश सुळ
Daund News : केडगाव : आजी-आजोबा तुम्ही वटवृक्षासारखे आहात. तुम्ही अनेक नाती-गोती विणलेली असून, नव्या-जुन्याला जोडणारा दुवा आहात. तुम्ही कुटुंबाचा पाया, आधार आणि आशीर्वाद आहात… चिमुरड्यांच्या जीवनात आजी-आजोबांचे स्थान महत्त्वपूर्ण असते. याच प्रेमळ आजी-आजोबांच्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दौंड तालुक्यातील राहु व देलवडीमधील जिल्हा परिषद शाळेत नातवंडांनी आजी-आजोबांसोबत खूप धमाल केली. विद्यार्थ्यांनी आजी-आजोबांचे पाद्यपूजन, औक्षण करण्याबरोबरच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या वेळी विविध खेळ आणि कार्यक्रम देखील झाले.
शाळांमध्ये ‘मस्ती की पाठशाला’
हल्ली नोकरी-व्यवसायामुळे पालकांना मुलांसोबत वेळ घालवता येत नाही. त्या पाल्यांना आजी-आजोबांचाच आसरा असतो. त्यांच्या अनुभवाच्या शिदोरीचा इतर विद्यार्थ्यांनाही लाभ मिळतो. आजी-आजोबा हे पहिले मित्र असतात. या नात्याची तेथूनच खरी जडणघडण असते. (Daund News) हे नाते पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचे आणि प्रेरणादायी आहे. आजच्या काळात हे नाते टिकून राहावे, यासाठी शाळांमध्ये ‘मस्ती की पाठशाला’ भरली आहे.
राहु व देलवडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आजी-आजोबांनी शाळेत जाऊन मुलांसोबत गप्पा मारल्या, गाणी गाऊन त्यांच्यासोबत धम्माल केली. गोष्टी सांगून त्यांचे मनोरंजन केले. या वेळी आजी-आजोबांनी आपल्या जीवनातील काही चांगले-वाईट प्रसंग कथित केले. (Daund News) काहींनी जेमतेम असलेल्या परस्थितीची जाणीव करून त्यातून मार्ग शोधला. असे अनेक प्रसंग यावेळी आजी-आजोबांनी कथन केले. यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली.
महिलांनी जात्यावरील गाणी, अभंग, बहिणाबाईंची गाणी गाऊन चिमुकल्यांसोबत धम्माल केली. या वेळी दोन्ही शाळांमध्ये २०० हून अधिक आजी-आजोबांनी उपस्थिती लावली. राहु येथील सरपंच दिलीप देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कुंभार या वेळी उपस्थित होते. (Daund News) शाळेचे मुख्याध्यापक शिवदास शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संगिता क्षीरसागर यांनी आभार मानले. देलवडी येथील बाजीराव सुळ, शंकर खेडेकर, महादेव शेलार, भाऊसाहेब वाघोले, बबन शिर्के, अनिल निगडे यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका शेलार यांनी सूत्रसंचालन केले तर गाडे यांनी आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : अर्ध्या किंमतीत वस्तू देण्याचे आमिष; वरवंडच्या महिलेची ७ लाखांची फसवणूक; तिघांना अटक