संदीप टुले
Daund News : केडगाव : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू झाली आहे. दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आहे. मात्र, अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता निवडणूक आयोगाचे संकेतस्थळच बंद पडल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडत आहे.
सर्व्हर डाऊन झाल्याने अर्ज भरता येत नसल्याच्या अनेक तक्रारी
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी दौंड विधानसभा मतदारसंघातील एकूण ११ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. केडगाव, पारगाव, खोपोडी, नायगाव, वाटलूज, मलठण, पांढरेवाडी, कुरकुंभ, वाखारी, पानवली, वडगांव बांडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कालावधी १६ ते २० ऑक्टोबर २०२३ असा आहे. राज्यभरात १६ ऑक्टोबरपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. (Daund News) मात्र, पाहिल्या दिवसापासूनच निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ बंद पडल्यामुळे अनेक ठिकाणी उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ सुरू झाली असताना, निवडणूक आयोगाची वेबसाईट चालत नसल्याने दौंड तालुक्यात एकच गोंधळ उडाला आहे.
सोमवारी (ता. १६) दिवसभर सर्व्हर डाऊन झाल्याने केडगाव व इतर परिसरातील अनेक इच्छुक उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी तरी सर्व्हर चालेल या आशेने अनेक इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सकाळपासूनच प्रयत्न करत होते. (Daund News) पण मंगळवारी (ता. १७) दुपारपर्यंत ही तीच दशा असल्याने त्यांना अर्ज न भरताच परतावे लागले. सर्व्हर डाऊन झाल्याने उमेदवारी अर्ज भरता येत नसल्याच्या अनेक तक्रारी येत असून उमेदवारी अर्ज भरण्यास आता फक्त तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. या सर्व्हरमुळे भावी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारावेत व त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडून परवानगी घ्यावी, त्यामुळे सर्वांनाच होणारा नाहक त्रास थांबेल.
– धनंजय शेळके,
उमेदवार, केडगाव
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड शहरात मंजूर केलेला कत्तलखाना तत्काळ रद्द करावा; हिंदू संघटनांची आग्रही मागणी
Daund News : विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्व दिले पाहिजे – माजी आमदार रमेश थोरात..
Daund News : दशक्रिया घाटांवर वाढतेय नेत्यांची भाषणबाजी; श्रद्धांजलीच्या नावाखाली जोरदार प्रचार